घरमहाराष्ट्रपरतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पोटात गोळा !

परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पोटात गोळा !

Subscribe

उशिरा मात्र दमदार झालेल्या पावसाने यंदा तालुक्यातील भातशेती चांगलीच बहरली असली तरी हाता तोंडाशी आलेल्या पिकाला परतीच्या पावसाचा फटका बसेल की काय, अशी भीती शेतकर्‍यांना वाटत आहे. तालुक्यात भातपिकाचे लागवड क्षेत्र सरासरी 3 हजार हेक्टर आहे. या वर्षी 2 हजार 754 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी हळवे व निमगरवे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, गरवे क्षेत्र अल्प प्रमाणात आहे. पावसाचा पूर्वानुभव लक्षात घेता शेतकरी वरुणराजाला नुकसान टाळण्यासाठी साकडे घालत आहे.

विशेष म्हणजे निवडक शेतकर्‍यांना भातपिकाच्या जोडीला तुरीचे बियाणे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे बांधावर तुरीचे 7.40 हेक्टर तुरीची लागवड झाली आहे. कृषी विभागातर्फे भात पिकांमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भात पिकाचे कर्जत 5, कर्जत 7 आणि कर्जत 9 या वाणाच्या बियाणाचे वाटप शेतकर्‍यांना करण्यात आले आहे. यामध्ये चारसुत्री भात लागवड, सगुणा भात तंत्रज्ञान वापरून लागवड, तसेच रम सीडर अशा तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाने उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकर्‍यांनी पारंपरिक पद्धतीने लागवड न करता या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन कृषी अधिकार्‍यांनी केले होते.

- Advertisement -

भात पिकासोबत कृषी विभागाने निवडक शेतकर्‍यांना 50 किलो तुरीचे बियाणे वाटप केले होते. बांधावर तुरीची लागवड करण्यात आल्याने भात पिकासोबत तूर पिकाचे अधिक उत्पादन शेतकर्‍यांना मिळणार आहे. भात पिकावर येणारे रोग व कीड रोग याबाबत कृषी विभागाकडून सर्व्हेक्षण करून शेतकर्‍यांना उपाययोजना करण्यासाठी माहिती देण्यात येत आहे. भाताचे पिक कापणीसाठी तयार झाले असताना परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उभे पीक आडवे झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान होणार असल्याने कृषी विभागाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे भात पिकाच्या पेरणीपूर्व कामापासून ते कापणीपर्यंत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी दहा शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले होते. सध्याचे हवामान पाहता शेतकर्‍यांनी कापणी करताना हवामानाचा अंदाज घ्यावा. तसेच शक्य असल्यास कापणी केलेले पीक शेतात न ठेवता लगेच झोडणी करून व्यवस्थित ठेवावे. शेतात कापणी करून पिकाची उडवी केली असल्यास त्यावर ताडपत्री अंथरून पावसापासून संरक्षण करावे.
-अर्चना सूळ, कृषी अधिकारी, खालापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -