घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये भीषण अपघात; विरुद्ध दिशेने आलेल्या रेल्वेच्या इंजिनामुळे चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

नाशिकमध्ये भीषण अपघात; विरुद्ध दिशेने आलेल्या रेल्वेच्या इंजिनामुळे चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Subscribe

Nashik Accident | ट्रॅकवर काम करत असताना अचानकपणे टॉवर मशीन आले आणि कोणताही हॉर्न न देता या कर्मचाऱ्यांना उडवून पुढे निघून गेले.

Nashik Accident | नाशिकरोड । मध्य रेल्वेच्या मनमाड सेक्शन युनिट २ मध्ये ट्रॅकचे काम करणाऱ्या चार रेल्वे कामगारांना टाॅवर मशिनने चिरडले आहे. यामुळे या कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

निफाड तालुक्यातील उगाव येथे रेल्वे ट्रॅकवर ट्रॅक मन व ओव्हर हेड इक्विपमेंट (टाॅवर) मशिन असे दोन पथकांना काम करण्यासाठी सोमवारी (दि.१३) पहाटे ब्लाॅक (सुरक्षित वेळ) मिळाला होता. त्यानुसार नाशिकरोड येथील टाॅवर वॅगन लासलगावच्या दिशेने गेले. मशिन पुढे गेल्याने उगाव येथील रेल्वे ट्रॅकला वळण असलेल्या ठिकाणी ट्रॅकमन यांनी काम सुरू केले होते. काम सुरू असताना लासलगाव येथून उलट्या दिशेने वेगाने आलेल्या टाॅवर मशिनने ट्रॅकवर काम करणाऱ्या कृष्णा अहिरे (मुकादम), दिनेश दराडे (ट्राॅली मॅन), संतोष केदारे व संतोष शिरसाठ यांना चिरडले.

- Advertisement -


टॉवर इंजिन लासलगाव बाजूने उगावकडे उलट्या दिशेने जात होते. पोल नंबर १५ ते १७ मधील ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) या मार्गावरील ऑफलाइनवर रेल्वेपासून पन्नास मिनिटे ते सहा वाजेपर्यंत ब्लॉक दिल्याचे समजते. आठ ते दहा कर्मचारी कामावर नेमण्यात आले. ट्रॅकवर काम करत असताना अचानकपणे टॉवर मशीन आले आणि कोणताही हॉर्न न देता या कर्मचाऱ्यांना उडवून पुढे निघून गेले.

घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोठुळे, लासलगाव येथील स्टेशन परिसरातील कार्यकर्त्यांनी या चौघांना डॉ. स्वप्नील पाटील यांच्या दवाखान्यात आणले. येथे त्यांची तपासणी करून या चारही रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच ठार झालेल्या चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी जोरदार आक्रोश केला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -