नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे नाराज नेते तथा माजीमंत्री बबनराव घोलप यांचे समर्थक व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दादर येथे शक्तीप्रदर्शन केले. तर, दुसरीकडे घोलप पूत्र माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खा. शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान, मातोश्रीवरुन चर्चेसाठी अद्याप प्रतिक्षा असल्याचे बबनराव घोलप यांनी सांगितले. (ex MLA Yogesh Gholap meets Sharad Pawar and Ex minister Babanrao Gholap make Demonstration of power at Dadar on behalf of the National Tanners’ Federation)
शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेत पुन्हा प्रवेश देत राजकीय प्रमोशन केल्याचे सांगत माजीमंत्री बबनराव घोलप यांनी नाराज होऊन उपनेते व संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. पक्षश्रेष्ठींनी राजीनामा स्वीकारला नसला तरी मातोश्रीवरुन चर्चेसाठी निरोप न आल्याने समर्थक शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रविवारी (दि.17) दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क येथील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
दुसरीकडे घोलप पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांनी महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी (दि.१७) दुपारी भेट घेतल्याने देवळालीत चर्चेला उधाण आले आहे. यावर बोलताना योगेश घोलप म्हणाले की, पवार साहेब हे महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते असल्याने त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, दिनेश धात्रक, उमेश खातळे, मनोज पालखेडे तर, शिवसेना ठाकरे गटाचे नितीन चिडे आदी उपस्थित होते. दरम्यान, मुंबईत झालेले शक्तीप्रदर्शन व माजी आमदार योगेश घोलप यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीने ठाकरे गटावर दबाव वाढल्याची चर्चा आहे. मातोश्रीकडून चर्चेची प्रतिक्षा असलेले बबनराव घोलप नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
आ. अहिरेंच्या काळजीत भर
देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आ. अहिरे या सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. महाविकास आघाडीच्या फॉर्म्यूल्याप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांच्या नावाचा विचार व्हावा, असा दावा केल्याचे समजते.