शिवजयंतीला गालबोट, हडसर किल्ल्यावर ट्रेकर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

जुन्नर तालुक्यातल्या हडसर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणीचा बुरुजावरून कोसळून दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे.

hadsar fort
हडसर किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, एकीकडे राज्यभर शिवजयंतीचा उत्साह असताना पुण्यातल्या हडसर किल्ल्यावर झालेल्या एका दुर्घटनेमध्ये एका ट्रेकर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. किर्ती कामठे असं या तरुणीचं नाव असून ती २० वर्षांची होती. मुंबईची रहिवासी असलेली ही तरुणी शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर गेली होती. मुंबईतल्याच एका शिवप्रेमी ट्रेकर्स ग्रुपसोबत ही तरुणी या किल्ल्यावर गेली होती.

बुरुजावरून कोसळली तरुणी

जुन्नर तालुक्यातल्या शिवनेरी किल्ल्यापासून जवळच हडसर हा किल्ला आहे. या किल्ल्यावर हा गट ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही तरुणी किल्ल्यावरच्या कुटीची वाट भागात गेली असता तोल जाऊन बुरुजावरून ती खाली कोसळली. तब्बल ४०० ते ४५० फूट खोल दरीत ही तरुणी पडली. हे लक्षात येताच आसपासच्या लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी पावलं उचलली. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेनंतर ट्रेकर्सनी किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.