आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आमदाराची फिल्डिंग, रश्मी ठाकरेंनाही दिला शब्द

aditya thackeray

Aditya Thackeray News | मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. आता, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हही ठाकरेंच्या हातून गेलं आहे. राज्याचे राजकारण ३६० अंशात फिरलेले आहे. असं असतानाच राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आदित्य ठाकरेंना बसवू असा शब्दच एका आमदाराने रश्मी ठाकरे यांना दिला आहे.

ठाकरे गट पक्षबांधणीत व्यस्त आहे. याकरता कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. उद्धव ठाकरेही महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून आदित्य ठाकरे ठिकठिकाणी विविध सभा घेत आहेत. तर, दुसरीकडे संजय राऊत, सुषमा अंधारेंसारख्या तोफा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवगर्जना अभियानाच्या मार्फत संवाद साधत आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे माजी पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा शब्द विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरेंची आई रश्मी ठाकरेंना सुनील शिंदे यांनी शब्द दिला आहे.


“रश्मी वहिनी तुम्ही कार्यक्रमाला आलात. ही वरळी शिवसेनेची आहे. ही वरळी उद्धव ठाकरे यांची आहे. ही वरळी आदित्य ठाकरे यांचीच असेल. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो की, आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करु”, असं सुनील शिंदे यांनी म्हंटलं आहे. महिला दिनानिमित्त ठाकरे गटाच्या वतीने वरळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.