घरमहाराष्ट्रब्लड कॅन्सरशी झुंज देत आर्यनची गगनभरारी... आयसीएसई दहावी परीक्षेत 96.4 टक्के

ब्लड कॅन्सरशी झुंज देत आर्यनची गगनभरारी… आयसीएसई दहावी परीक्षेत 96.4 टक्के

Subscribe

मुंबई : प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचे एक कथन आहे, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं… याचा प्रत्यय विलेपार्ले पूर्व येथे राहणाऱ्या आर्यन रहाटे याने आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत दाखवून दिले आहे. रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत असताना या पठ्ठ्याने आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी परीक्षेत तब्बल 96.4 टक्के गुण मिळवले आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये एकीकडे सर्व दिवाळी साजरी करत असताना दुसरीकडे मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक शाळेचा विद्यार्थी आर्यन रहाटे याने रक्ताच्या कर्करोगाशी (ब्लड कॅन्सर) खंबीरपणे लढा देण्यास सुरुवात केली. 16 वर्षीय आर्यन शाळेच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन होता. पण ऑक्टोबर 2022मध्ये आर्यनला सतत ताप येऊ लागला. वेगवेगळ्या डॉक्टरांकडून उपचारही करण्यात आले, पण गुण काही पडेना. योग्य निदानही होत नव्हते. वारंवार येणाऱ्या तापामुळे खूप अशक्तपणा आला होता. अखेर नोव्हेंबर महिन्यात आर्यनला रक्ताचा कर्करोग (एक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया) झाल्याचे निदान झाले.

- Advertisement -

डिसेंबर 2022मध्ये आर्यनचा पहिला एमआरडी रिपोर्ट फारसा उत्साहवर्धक नव्हता. मात्र आता फेब्रुवारी 2023मध्ये काढलेल्या एमआरडीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दोन महिने त्याला मोठ्या प्रमाणात केमोथेरपी घ्यावी लागली. परंतु तो खचला नाही आणि अभ्यासाची जिद्दही सोडली नाही. डॉ. निशा अय्यर आर्यनवर उपाचार करत आहेत. बालपणात झालेला रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरा होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. याच उमेदीवर आर्यन आणि त्याचे कुटुंबीय या आजाराशी निकराने झुंज देत आहेत.

मात्र आर्यन आणि त्याच्या कुटुंबीयांनी या आजारापुढे कच खाल्ली नाही. अशा परीस्थितीत शाळेत आणि कोचिंग क्लासला जाता येत नव्हते. पण तरीही त्याने घरच्या घरी आपला अभ्यास सुरूच ठेवला. विशेष म्हणजे, पार्ले टिळक शाळेच्या प्रशासनानेही त्याला मोलाची मदत केली. प्रोजेक्ट्स तसेच असाईंन्मेंट्स सादर करण्यास आर्यनला पुरेश मुदत दिली. आर्यनला इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला एका स्वतंत्र खोलीत विलगीकरणात राहून परीक्षा द्यावी लागली. इयत्ता दहावीच्या परीक्षेतील तीन पेपर त्याने सांताक्रूझमधील सूर्या रुग्णालयातूनच दिले. पण त्याने जिद्द सोडली नाही. त्याच्या मेहनतीचे फळ अलीकडेच जाहीर झालेल्या आयसीएसई इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालातून दिसले. त्याला इयत्ता दहावीत 96.4 टक्के गुण मिळाले. त्याने मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल उद्धव ठाकरे गटाचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर व महिला शाखासंघटक अपर्णा उतेकर यांनी त्याच्या घरी जाऊन आर्यनचा सत्कार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -