घरठाणेबदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक, एसी लोकलविरोधात आंदोलन

बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक, एसी लोकलविरोधात आंदोलन

Subscribe

मागील काही दिवसांपासून ठाणे, कळवा आणि बदलापूर रेल्वे स्थानकात एसी लोकलविरोधात जोरदार आंदोलनं सुरू होती. एसी लोकल ट्रेनचा विषय विधानसभेत देखील गाजला. परंतु आज बदलापूर रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा प्रवाशांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या या आंदोलनाला यश मिळालं असून बदलापुरात एसी लोकल बंद करण्यात आल्या आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलविरोधात आंदोलन केले. या आंदोलनानंतर अखेर एसी लोकल बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केला.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी सुटणारी लोकल पूर्वी साधी होती. तीच लोकल काही दिवसांपूर्वी एसी करण्यात आली होती. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी सुटणारी ही लोकल बदलापूरला रिकामी येत होती. तर या गर्दीचा सगळा भार ५ वाजून ३३ मिनिटांनी सुटणाऱ्या खोपोली लोकलवर पडत होता. त्यामुळे एसी लोकल रद्द करून साधी लोकल चालवण्याची मागणी बदलापूरचे रेल्वे प्रवासी करत होते. मात्र ही मागणी मान्य होत नसल्याने २ दिवसांपासून स्टेशन मास्तरांना घेराव घालून निदर्शने करत होते. तसंच शहरातील नेते कॅप्टन आशिष दामले यांनी प्रवाशांची समस्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर मांडली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून रेल्वेमंत्र्यांना प्रवाशांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली होती. तर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी ही समस्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर मांडली होती.

- Advertisement -

यानंतर बुधवारी संध्याकाळी पुन्हा एकदा एसी लोकल सुटल्याने प्रवाशांनी विनातिकीट एसी लोकलने प्रवास केला आणि त्यानंतर बदलापूर स्थानकात स्टेशन मास्तर कार्यालयाबाहेर जमून एसी लोकल रद्द करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. प्रवाशांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर रेल्वे प्रशासनाने “उद्यापासून एसी लोकल बंद” असा फलक दाखवल्यानंतर नागरिकांनी एकच जल्लोष केला आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. दरम्यान प्रवाशांचा एसी लोकलला विरोध नाही तर साधी लोकल बंद करून त्याजागी एसी लोकल सुरू करायला विरोध आहे. एसी लोकलसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.

२२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास खोपोली लोकलने उतरलेल्या बदलापुरकरांनी थेट स्टेशन मास्तर ऑफिस गाठत आपला संताप व्यक्त केला. तसंच गर्दीच्या वेळी सोडली जाणारी एसी लोकल बंद करत त्याजागी पुन्हा साधी लोकल सोडण्याची मागणी केली होती. मागील शुक्रवारी एसी लोकलच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. पण त्या १० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी रेल्वेप्रशासनाने तिकीटदर निम्मे केले. त्यामुळे या गाड्यांसाठी प्रवाशांची गर्दी वाढू लागली. हे लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ८ ऑगस्टपासून एसी लोकलच्या आठ फेऱ्या वाढवल्या. त्यापाठोपाठ मध्य रेल्वेने देखील १९ ऑगस्टपासून एसी लोकलच्या १० फेऱ्या वाढवल्या. ठाणे-सीएसएमटी-ठाणे अप आणि डाऊन मार्गावर चार फेऱ्या, बदलापूर-सीएसएमटी-बदलापूर चार फेऱ्या, कल्याण-सीएसएमटी-कल्याण दोन फेऱ्या अशा चालविण्यात येत होत्या. बहुतांश फेऱ्या सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळच्या होत्या. पण त्याला नागरिकांनी विरोध केला.

हेही वाचा : ‘…नाहीतर मुंबईच्या प्रत्येक स्टेशनवर आग लागेल’; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

कळव्यातील रेल्वेप्रवाशांची ट्रॅकवरुन पायी वारी

ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर कळव्यातील प्रवाशांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु या नव्या ट्रॅकवरून मेल एक्स्प्रेस सुरू करण्याची अपेक्षा असताना जुन्या ट्रॅकवरून सुरू केल्याने वादाला तोंड फुटले. त्यातच कळवा रेल्वे स्थानकात सकाळी प्रचंड गर्दी होत असल्याने रेल्वे डब्यात चढायलाही मिळत नसल्याने सर्वसामान्य प्रवाश्यांची मदार कारशेडमधून सकाळच्या वेळी सुटणाऱ्या चार गाड्यांवर होती.

परंतु गेल्या चार दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सध्या लोकल बंद करून अचानक या चार गाड्यांपैकी तीन गाड्या ऐसी स्वरूपाच्या सोडल्याने रोज सकाळी कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाश्यांना या गाड्यांत चढतेवेळी कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कळव्यातील रेल्वे प्रवाशांच्या मनात उद्रेक निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकलवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. कळवा-दिवा येथील प्रवाशांना सकाळच्या सत्रामध्ये मोठा त्रास होतो. सकाळी कळवा कारशेड येथून कळव्यातील प्रवासी लोकल पकडत होते. परंतु ऐनवेळी एसी लोकल सोडल्याने प्रवाशांना नंतरच्या लोकलमध्ये चढता आले नाही. यामुळे प्रवाशांनी आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची आंदोलकांनी भेट घेतली. त्यानंतर आव्हाड यांनी, सकाळी आठ ते दहा या वेळेत एसी लोकल बंद करण्यात याव्यात अन्यथा प्रवाशांकडून तीव्र आंदोलन होईल, असा इशारा दिला.


हेही वाचा : कळव्यातील रेल्वेप्रवाशांची ट्रॅकवरुन पायी वारी, आंदोलनाचा उद्रेक कायम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -