अखेर! अंजनेरीच्या ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांचे निलंबन

नाशिक : त्र्यंबक तालुक्यातील अंजनेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याकारणाने प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या आईनेच महिलेची प्रसुती केल्याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असतांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनीही अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय टीमवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी सीईआेंनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे, पीएसीच्या दोघा आरोग्य अधिकार्‍यांवर तातडीने निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी सीईओ मित्तल यांच्याकडे दाखल केला आहे.

अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी, ३ कंत्राटी परिचर, 1 महिला परिचर, १ वाहनचालक, १ सिस्टर (उपकेंद्र) अशी टीम कार्यरत आहे. रविवारी (दि.5 फेब्रुवारी) दोघे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सोनवणे, डॉ. आशिष सोनवणे हे हजर नसल्याने सकाळी 9 वाजेच्या सुमारास प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची प्रसुती तिच्या आईनेच केली. यावेळी केंद्रात 3 परिचर हजर होते, त्यांनी जवळच राहणार्‍या सुईनबाईला (मदतनीस) बोलवले. महिलेची प्रसुती योग्य पध्दतीने करण्यात आली. मात्र वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याकारणाने महिलेच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकत होता. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल यांनी दोघा वैद्यकीय अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते यांना दिले आहेत. याअनुषंगाने वैद्यकीय अधिकार्‍यांचा निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्वरेने कारवाई करण्यात येत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या गंभीर घटनेची दखल घेत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निलंबनाचे आदेश आरोग्य संचालकांना दिले आहेत.

नेमका काय घडला होता प्रकार

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ 10 ते १५ कुटुंबियांची वस्ती असलेली बरड्याचीवाडी आहे. यशोदा त्र्यंबक आव्हाटे यांना प्रसूती कळा सुरु झाल्याने रविवारी (दि.५) सकाळीच आई सोनाबाई आव्हाटे यांनी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्याने सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करने प्रसूती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालून प्रसूती केली. विवाहितेच्या आईने कशीबशी डिलिव्हरी केली. यावेळी गर्भवती महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच परिस्थिती असून, एकही डॉक्टर मुख्यालय राहत नाही. आरोग्य केंद्राच्या हद्दीतून पेशंट कधीही केंद्रात दाखल होउ शकतो, मात्र अशावेळी अधिकारी, कर्मचारी केंद्रात हजर नसतात. यामुळे रुग्णांना समस्यांचा सामना करावा लागतो. अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे.

पुन्हा असा प्रकार घडल्यास फौजदारी कारवाई

महाशिवरात्रीला राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तातडीने मदत उपलब्ध न झाल्याने प्रगती वाघ या इयत्ता 12 वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता, त्यानंतर अंजनेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिलेच्या प्रसुतीचा प्रश्न ऐरणीवर आला. वारंवार घडणार्‍या अशा घटनांमुळे आरोग्य केंद्रांबद्दल ग्रामीणवासियांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याने भविष्यात पुन्हा असा प्रकार घडल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद सीईओ आशिमा मित्तल यांनी दिला आहे.

हजेरीसाठी बायोमेट्रीक पध्दत अवलंबणार

नियमितपणे वैदयकीय अधिकार्‍यांची जिल्हा परिषदेत बैठक घेऊन योग्य त्या सुचना देण्यात येऊनही वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात हजर रहात नसल्याने बायोमेट्रीक हजेरी सुरु करणार असल्याचे सीईओ मित्तल यांनी सांगितले. याचबरोबर मोबाईल अ‍ॅपद्वारे बायोमेट्रीक हजेरी लिंक करण्यात येणार आहे. यामुळे अधिकारी कुठल्या लोकेशनला आहे हे समजणार आहे. पीएसी हद्दीतील सरपंच, उपसरंपच यांच्या समितीद्वारे आरोग्य केंद्रांवर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यासाठी पॉलिसी ठरविण्याच्या सुचनाही सीईआेंनी दिल्या आहेत.

पदभरतीसाठी राज्यशासनाला विनंती

जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रांवर आरोग्य सहाय्यकांची रिकामी पदे भरण्यासाठी तातडीने राज्य शासनाला विनंती पत्र पाठविण्यात येणार आहे.

वाहनचालक नसल्यास अ‍ॅम्ब्युलन्स पेशंटला उपलब्ध होत नाही. अशावेळी शेजारील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्याबाबत नियोजन सुरु आहे. : डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा आरोग्य अधिकारी