मुंबई : सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी यांच्यातील निकराच्या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार याचा फैसला आज, शनिवारी (23 नोव्हेंबर) होणार आहे. राज्यातील 288 मतमोजणी केंद्रांवर एकाचवेळी मतांच्या मोजणीला सुरुवात झाली असून निवडणूक आयोगाची यंत्रणा सुद्धा सज्ज झाली आहे. मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार असल्याने आज संध्याकाळपर्यंत नव्या सरकार स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Find out where you can check the results of Maharashtra Assembly Election 2024)
पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान झाले. तब्बल 30 वर्षानंतर राज्यात विधानसभेसाठी सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच टक्के मतदान जास्त झाले आहे. या जादा मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार याविषयी उत्सुकता आहे. जादा मतदान आपल्याच पारड्यात झाल्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडीने केला आहे. विविध संस्थांनी जाहीर केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांतील गोंधळामुळे निकालाविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी निकालानंतर निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीनुसार आपले प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार ठेवले आहेत.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत इतक्या अपक्षांनी दिला धक्का
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी सहा सहावाजेपासून सुरू होईल. निवडणूक आयोगाचे निरीक्षक, उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सीलबंद स्ट्रॉंग रूम उघडण्यात येतील. तेथून पोस्टल मतपत्रिका आणि मतदान मतमोजणी केंद्रांवर आणले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे. सकाळी आठ वाजता पोस्टाने प्राप्त झालेल्या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता मतदान यंत्रातील मतांची मोजणी सुरू होईल. यानंतर सुरुवातीच्या काही तासांमध्ये कल स्पष्ट होतील. यानंतर थोड्या थोड्या वेळाने निकाल लागण्यास सुरुवात होईल आणि संध्याकाळपर्यंत नव्या सरकार स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकता?
दरम्यान, राज्यात महायुती की महाविकास आघाडीचे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रत्येकाचे निकालाकडे लक्ष लागले आहे. जर तुम्हाला निकाल पाहायचा असेल तर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर (www.eci.gov.in or results.eci.gov.in) तुम्हाला सर्व निकाल पाहता येतील. त्याचबरोबर माय महानगरच्या वेबसाईटवरही तुम्ही निकाल पाहू शकता.
हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास काय होणार?