प्रभादेवी राडाप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल, पाचजण अटकेत; शिंदे गटाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, विपुल ताटकर, यशवंत विचले आदींसह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

shinde and shivsena clashes

मुंबई – शिवसेना – शिंदे गटात मध्यरात्री झालेल्या राड्याप्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल झाले असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून अटक केलेल्यांमध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे.

महेश सावंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन संतोष तेलवणे यांना मारहाण केली. या कार्यकर्त्यांनी २० ते २५ कार्यकर्ते बांबू, चॉपर, लाठ्या काठ्यांसह संतोष तेलवणे यांना मारहाण केली, असा आरोप संतोष यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. तसंच, मारहाणीत आणि धावपळीत संतोष तेलवणे यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम सोन्याची चैन, पंचमुखी रुद्राक्षासह पळवून नेली अशीही तक्रार त्यांनी केली. महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत, विनायक देवरुखकर, विपुल ताटकर, यशवंत विचले आदींसह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा – शिवसेना आणि शिंदे गट मध्यरात्री भिडले, दोन्ही गटात हाणामारी; सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

काय आहे प्रकरण?

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. या मंचाच्या शेजारीच शिंदे गटानेही मंच उभारला होता. शिंदे गटातील लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. यातून शिंदे गटातील माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि शिवसेनेतील माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद निर्माण झाले. शाब्दिक बाचाबाची होऊन वाद वाढत गेला. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, हा वाद इथेच शमेल असं वाटत असतानाच या वादाबाबत शिंदे गटातील संतोष तेलावणे यांनी फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट लिहून अपशब्द वापरले. यावरून शिवसैनिक संतापले आणि त्यांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. यानंतर समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. तसेच, त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घातला असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे दोन्ही गटातील लोकांना दादर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ताब्यात घेतलं.