Breaking News – पिंपरी चिंचवडमध्ये आगीत तीन हॉटेल जळून खाक

या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या.

Fire at three hotels in Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवडमध्ये आगीत तीन हॉटेल जळून खाक

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे तीन हॉटेल्सला भीषण आग लागली असून यात तिनही हॉटेल जळून खाक झाल्या आहेत. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. घटनेत जिवीतहानी झालेली नाही. परंतु तीनही हॉटेल्स जळून खाक झाल्या आहेत. त्याचबरोबर या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या.

नेमकं काय घडलं?

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी चारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे पिंपळे सौदागर येथील आयकॉन रोड लगत असलेल्या तीन हॉटेल्सना भीषण आग लागली. यात तिनही हॉटेल्स जळून खाक झाले असून तब्बल ७ लाख ७० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे कर्मचारी भूषण येवले यांनी दिली आहे. या आगीत हॉटेल वैष्णवी, जस्ट बिल आणि हॉटेल २७ हे जळून खाक झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अर्धा तास लागला. पिंपरी, भोसरी आणि प्राधिकरण येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अधिकारी संतोष सरोटे, विजय घुगे, भूषण येवले, ओमकार फरांदे, चालक राजाराम लांडगे यांनी आग विझली.

लोक शूटींग करण्यात दंग

दरम्यान आग लागली की अग्निशमन दलाला फोन करण्याऐवजी नागरिक मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रण करण्यात दंग असतात. पिंपरी चिंचवडमध्येही असच काहीसं घडलं. पण तिथे उपस्थित असणाऱ्या रिक्षावाले काकांनी मोबाईलमध्ये शूट करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. फोटो काय काढताय त्या आग विझवणाऱ्यांना कळवा, असे ते काका म्हणाले. तरीही उपस्थितांनी शूटिंग काही बंद केलं नाही.


हेही वाचा – कल्याणमध्ये चायनिज हॉटेलला आग; अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू