Mumbai kamla building fire : मुंबईतील कमला इमारतीला लागलेल्या आगीत मृतांची संख्या ७ वर, ८ जणांची प्रकृती गंभीर

ताडदेव, नाना चौक, ग्वालिया टँक येथील कमला या तळमजला अधिक २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर २२ जानेवारी रोजी भीषण आग लागून ६ जणांचा होरपळून व आगीचा धूर नाकातोंडात गेल्याने गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला होता तर २४ जण जखमी झाले होते. या जखमींपैकी एक गंभीर जखमी मनीष सिंह (३८) यांचा उपचारादरम्यान नायर रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या ७ वर गेली असून मृतांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. या संदर्भातील माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

कमला या इमारतीमध्ये २२ जानेवारी रोजी भीषण आग लागून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर या दुर्घटनेत २४ जण जखमी झाले होते. त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना नायर रुग्णालयात दाखल मनीष सिंह (३८) या गंभीर जखमी व्यक्तीचा सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ७ झाली आहे. तर २४ जखमींपैकी ७ जणांना वेळीच उपचार घेतल्याने घरी पाठविण्यात आले.

तर उर्वरित २३ जखमींपैकी, १२ जण भाटिया रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. तसेच, मसीना रुग्णालयातील एकजण व कस्तुरबा रुग्णालयातील एकजण अशा ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. तर नायर रुग्णालयात २ जखमींवर उपचार सुरू आहेत.

१५ दिवसांत चौकशी अहवाल

या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी परिमंडळ -२ चे उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. ही समिती या भीषण दुर्घटनेकजी १५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) (शहर), उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांचा देखील समावेश आहे. ही समिती, आग लागल्याचे नेमके कारण, आग पसरून ७ नागरिकांचा मृत्यू होण्यामागील कारणे आणि सदर इमारतीच्या मंजूर आराखड्यामध्ये कोणतेही विनापरवानगी बदल करण्यात आले असल्यास त्याची सखोल चौकशी करणार आहे.


हेही वाचा : Polar Bears : पहिल्यांदाच ध्रुवीय अस्वलानं केली रेनडियरची शिकार, Global Warming बाबत वैज्ञानिकांचा मोठा खुलासा