Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र अग्नितांडव : मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी आगीच्या घटना

अग्नितांडव : मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी आगीच्या घटना

Related Story

- Advertisement -

राज्यात मुंबई, पुण्यासह आगीच्या मोठ्या घटनांत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी प्रभादेवी, कुर्ला, बदलापूर आणि विरार भागात आगीच्या घटना घडल्या. त्याचवेळी इमारतीला आग लागली. याचवेळी पुण्यात कॅम्प आणि खराडी भागात आग लागण्याचे प्रकार घडले. आगीने नुकसान झाले असले तरी या घटनांमध्ये कोणी मृत्युमुखी न झाल्याने परिसरातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

प्रभादेवी येथे गॅमन हाऊस इमारतीच्या तळमजल्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० गाड्या आल्या होत्या. तर कुर्ला पश्चिमेला पोलीस स्टेशनच्या जवळ एका घराला लागलेली भीषण आग विझवण्यासाठीअग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली.

- Advertisement -

ईस्टर इंडिया केमिकल कंपनी जळून खाक
बदलापूर खरवई एमआयडीसीतल्या ईस्टर इंडिया या केमिकल कंपनीला भीषण आग लागली. शुक्रवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. दोन तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या होत्या. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून गेले तीन महिने ही कंपनी बंद होती.

कॅम्प परिसर, खराडीत आगडोंब
पुण्याच्या कॅम्प परिसरामध्ये फॅशन स्ट्रिट मार्केटमध्ये भीषण आग लागली होती. शुक्रवारी मध्यरात्री ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. फॅशन स्ट्रिट भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कापडाची दुकाने आणि गोदामे असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. खूप स्टॉल्स आगीत जळून खाक झाले. आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे. याचबरोबर खराडीतील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. शुक्रवारी दहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीचा जवळपास आठ ते दहा दुकानांना फटका बसला. अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग विझवली असली तरी आगीची भीषणता अधिक असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

- Advertisement -

विरार येथील गडावर वणवा
विरारच्या जीवदानी गडावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वणवा पेटून आगीचा भडका उडाला होता. काही वेळातच ही आग डोंगरावर पसरली होती. जीवदानी गडावर भाविकांना मंदिरात नेण्यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने फनिक्युलर ट्रेनची सुविधा करण्यात आली असून या ट्रेनच्या अगदी थोड्याच अंतरापर्यंत या आगीचे लोळ पसरले होते. त्यामुळे या ट्रेनच्या केबल जळण्याचा धोका होता. मंदिर ट्रस्टकडून ट्रेनची सुविधा ताबडतोब बंद करण्यात आली. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वसई विरार मधल्या डोंगराळ भागात आग लागण्याचे सत्र सुरूच असून दहा दिवसांपूर्वी सातिवली खिंड परिसरात अशीच आग लागली होती.

- Advertisement -