घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

Subscribe

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. अण्णा बनसोडे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, सुदैवाने एकही गोळी बनसोडे यांना लागली नाही आणि ते सध्या सुखरूप आहेत. ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत.

अण्णा बनसोडे यांच्यावर आज दुपारी गोळीबार झाला. अँथोनी नावाच्या ठेकेदाराच्या मॅनेजरने बनसोडे यांच्यावर गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. प्राथमिक माहितीत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं आडनाव पवार असं आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार बनसोडे यांच्या कार्यलयाच्या समोर घडल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

- Advertisement -

तथापि, हा गोळीबार का करण्यात आला? हे अद्याप समजलेलं नाही. मीच पवारला बोलवलं होतं, अशी माहिती पोलिसांना अण्णा बनसोडे यांनी दिली. दरम्यान, पोलीस अधिक तपास करत असून तानाजी पवार हे सीआरपीएफचे निवृत्त जवान आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, हल्ला झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठेकेदार अँथोनी यांचा सुपरवायझर तानाजी पवारला गेल्या काही दिवसांपासून दोन मुलांना कामाला लावण्यासंदर्भात आम्ही संपर्क करत होतो. माझ्या पीएने तानाजी पवारला फोन केला होता. मात्र त्याने बोलताना अरेरावी केली. त्यामुळे मी त्याला बोलावून घेतलं होतं. त्याला समजावून सांगितलं. मात्र त्याने बाहेर जाऊन थेट गोळीबार केला, असं बनसोडे यांनी सांगितलं.

- Advertisement -

कोण आहेत अण्णा बनसोडे?

अण्णा बनसोडे हे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापुर्वी ते २००९मध्ये देखील निवडून आले होते. अण्णा बनसोडे यांनी २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा १६ हजार ८५६ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये अण्णा बनसोडे यांचा गौतम चाबुकस्वार यांनी २ हजार मतांनी पराभव केला होता. २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -