घरताज्या घडामोडीZika virus: आता महाराष्ट्रावर झिका व्हायरसचे सावट; पुण्यात आढळला पहिला रुग्ण

Zika virus: आता महाराष्ट्रावर झिका व्हायरसचे सावट; पुण्यात आढळला पहिला रुग्ण

Subscribe

राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं आव्हान संपुष्टात आलं नाही आहे. कोरोना महामारीच्या कचाट्यातून सुटत असताना राज्यावर आता झिका व्हायरसचे सावट आलं आहे. महाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला आहे. त्यामुळे आता पुण्यासह राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये झिका व्हायरसचा नवा रुग्ण आढळला आहे. ५० वर्षी महिलेला झिका व्हायरसची लागण झाली आहे. सध्या या रुग्णाची हिस्ट्री तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच बेलसरमध्ये तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. आवटे यांनी दिली आहे.

- Advertisement -

बेलसर हे पुरंदर तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव असून या ठिकाणी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ताप रुग्ण आढळून येत होते. त्यातील पाच रुग्णांचे नमुने दिनांक १६ जुलैला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे तपासण्यासाठी पाठविले असता त्यापैकी तीन जणांना चिकनगुनिया आजाराचे झाल्याचे समोर आले. मग २७ ते २९ जुलै या कालावधीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डेंग्यू चिकनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या टीम बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ४१ संशयित रुग्णांचे ब्लड सॅपल घेतले. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया तर ३ जणांना डेंग्यू आजार असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरून स्पष्ट झाले असून बेलसर गावातील एका ५० वर्षाच्या महिलेस झिका व्हायरस आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष ३० जुलैला प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रामध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे.

आज डॉ.प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, डॉ. कमलापुरकर, सहाय्यक संचालक, हत्तीरोग आणि डॉ.महेंद्र जगताप, राज्य कीटकशास्त्रज्ञ या राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
बेलसर गावातील सदर झिका रुग्ण सध्या पूर्णपणे बरा झालेला असून या महिलेस कोणतीही लक्षणे नाहीत तसेच तिच्या घरांमध्येही कोणाला काही लक्षणे नाही आहेत. दरम्यान झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यूप्रमाणे आहेत. ज्यामध्ये ताप येणे, पुरळ येणे या व्यतिरिक्त सांधेदुखीचा त्रास होणे आहे.

- Advertisement -

यापूर्वी केरळमध्ये ७ जुलैला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. केरळमधील २४ वर्षांच्या गर्भवती महिलेला झिका व्हायरसचा संसर्ग झाला होता. आज केरळमध्ये दोन झिकाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे केरळमधील झिकाबाधित रुग्णांची संख्या ६३वर पोहोचली आहे. यापैकी सध्या ३ सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहिती केरळ आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -