पहिला चॉकलेट बॉय

हिंदी पडद्यावर दाखल झालेल्या बाल कलाकार ऋषीचा पहिला चित्रपट ‘मेरा नाम जोकर’ वडील राज कपूर यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तिकीटबारीवर दणकून आपटला होता. त्यानंतर मेरा नाम जोकरमुळे झालेलं नुकसान कसं भरून काढावं, या चिंतेत आर के फिल्म्स असताना टिनेजर लव्ह स्टोरी बनवावी का, असा विचार राज कपूरच्या मनात आला आणि विरूनही गेला. त्याकाळी टिनेजर लव्ह स्टोर्‍या बनवल्या जात नव्हत्या. सामाजिक संस्काराच्या पलिकडचा हा विषय होता. शाळेत शिकणार्‍या कुमारवयातल्या पोरापोरींचा प्रेमपट बनवणं ही रिस्क होती. बरं ही रिस्क ज्याच्यासाठी घेतली होती तो कुमारमुलगा ऋषीचा ‘मेरा नाम जोकर’चा अनुभव निराश करणारा होता. पण, मेरा नाम जोकर…हा राज कपूरचा हट्टाग्रह होता. बॉबीचं तसं नव्हतं, हे सत्तरचं हिंदी पडद्यावरचं सर्वात मोठं रोमँटीक दशक होतं. राजेश खन्ना, देव आनंद, शशी कपूर यांच्या गाण्यांचे प्रणयपट तिकिटबारीवर खोर्‍यानं पैसा खेचत होते. अशा परिस्थितीत ऋषीला लाँच करणं धोक्याचं होतं.

पण राज कपूरने ‘मेरा नाम जोकर’ प्रमाणेच याही वेळेस मुलाला घेऊन हा धोका पत्करला. त्यावेळच्या तत्कालीन सिनेमासिकांनी मेरा नाम जोकरमधून आलेल्या अनुभवातून आंधळ्या धृतराष्ट्राचं दिवाळखोरीकडे नेणारं आंधळ पूत्रप्रेम, अशी टीका सुरू केली होती. पण अभिनयाचा ऋषीचा दुर्योधन होणं शक्य नव्हतं. त्याच्या अभिनयात निरागसता होती. बॉबीचं गाणं…‘मै शायर तो नही’ चं, शूटींग घरातल्याच आर के स्टुडिओत सुरू होतं. त्यावेळी रिंगमध्ये कसलेल्या सिंहासारख्या मल्लासमोर एखाद्या कोकराला सोडावं, असं ऋषी कपूरला कॅमेर्‍यासमोर राज कपूरनं सोडलं होतं. या गाण्यात आनंद बक्षींनी लिहीलेले शब्द परिणामकारक होते. पण गाण्याच्या शब्दांप्रमाणे अभिनय करण्याची कुठलीही तालिम राज कपूरनं दिलेली नव्हती. सोचता हूँ अगर मैं दुवा माँगता…या शब्दांवेळी कुमारवयीन ऋषीने अवघडल्यासारखे हात वर उचलले होते. या गाण्यातील त्याचे अवघडलेपण हरेक प्रसंगात दिसत असल्याचं त्यानं रजत शर्माच्या शोमध्ये सांगितलं होतं. बॉबीनं मेरा नाम जोकरमुळे झालेलं आर केचं नुकसानही भरून काढलं. राज कपूरने ऋषीला घेऊन घेतलेली रिस्क योग्य निर्णय ठरला.

पुढे लैला मजनू, खेल खेल में, असे प्रेमपट बनले. शैलेंद्र सिंगचा आवाज ऋषीची ओळख बनून गेला. जसा मुकेशचा आवाज पिता राज यांची ओळख बनला होता. ऐंशीच्या दशकापर्यंत सुभाष घईंचा ‘कर्ज’ येईपर्यंत ऋषीची ही स्थिती कायम होती. काश्मीरच्या डोंगरदर्‍यात नायिकेला बर्फ फेकून मारणारा चॉकलेट हिरो अशी ओळख आता गडद झाली होती. ती पुसणं ऋषीला कठीण जात होतं. ‘अमर अकबर अँथनी’मध्ये मनमोहन देसाईंनी ऋषीचा अकबर इलाहाबादी केला तर त्याच्या प्रेमात असलेली नितू सिंग त्याची बेगम झाली होती. रफी साहेबांची, परदा है परदा…ही कव्वाली ऋषीसाठीच बनवली गेली होती, असं अमिताभसाठी या गाण्यातील केवळ एक ओळ गाणारा किशोर कुमार त्यावेळी हे गाणं पडद्यावर पाहिल्यावर म्हणाला होता. लैला मजनू, खेल खेल में, कर्ज सारख्या प्रेमपटांनी ऋषीची चॉकलेट बॉय ही इमेज कमालीची गडद केली होती. ‘कर्ज’नंतर किशोरच्या आवाजामुळे ऐंशीच्या दशकात रोमँटीक हिरोची ऋषीची ही छबी आणखी कठिण झाली. स्वतः ऋषी त्याबाबत खंत करत होता. त्याला आता हिरोइनसोबत झाडाभोवती गोल गोल फिरण्याचा कंटाळा आला होता.

मित्र विनोद मेहराने त्याला गुरुदेवमध्ये इन्स्पेक्टरची भूमिका देऊन हा ठसा पुसण्याला मदत केली. हवालात, इज्जत की रोटी, दामिनी असे प्रयत्न त्यात होते. पण दामिनी वगळता इतर प्रयत्न फारसे यशस्वी ठरले नाहीत. हिंदी पडद्यावर सर्वाधिक नायिकांबरोबर काम करण्याचा विक्रम ऋषीच्या नावावर आहे. सिमी गरेवाल व्हाया डिंपल कपाडीयापासून कालपरवाच्या रविना, तब्बूपर्यंत त्याने पडद्यावर रोमान्स केला. ऋषी या रोमँटीक इमेजला पुरता कंटाळला होता. त्यामुळेच त्याने नव्वदच्या दशकात अशा चित्रपटांपासून दूर जाण्याचे ठरवले. त्यामुळे त्याला चित्रपट मिळणे कमी झाले. प्रणयप्रधान सिनेमांचा हुकूमी एक्का म्हणून ऋषीकडे पाहिले जात होते. मात्र रोमँटिकतेलाच नकार दिल्याने त्याचे बॉक्स तिकिटबारीवरील मूल्य कमी झाल्याची चर्चा सिने इंडस्ट्रीत सुरू झाली. काही अंशी ते खरंही होतं. उच्च आशयमूल्य आणि वैविध्यपूर्ण भूमिका ऋषीच्या वाट्याला यायला नवं शतक उजाडावं लागलं. अलिकडच्या काळातले निगेटिव्ह शेडमधले अग्निपथ, डी डे मध्ये ऋषीच्या अभिनयाचा दुसरा पैलू प्रेक्षकांना दिसला. पण बर्‍याच उशिराने हे घडलं. ऋषीच्या अभिनयाचा आवाका मोठा होता. तो वैविध्यपूर्ण असावा यासाठी त्याने कमालीचे प्रयत्न केले.

ऐंशीच्या दशकात त्याचा ‘तवायफ’ चित्रपटाने प्रभावित होऊन कुख्यात गँगस्टर दाऊदने त्याला दुबईत घरी भेटायला बोलावलं होतं. पण त्याच्या भेटीला सकारण आणि थेट नकार देणारा ऋषी होता. आपल्या मांसाहाराबाबत स्पष्ट बोलणारा ऋषीच होता. राजकारण, सरकारी यंत्रणेला फैलावर घेणारा ऋषी कायम ऊर्जेनं भरलेला, हसतमुख आणि प्रसन्न होता. रोमँटीक सिनेमाच्या पलिकडच्या हिरोच्या अभिनयावरील पडदा नुकताच उघडला होता. त्याच्या अभिनयाचा दुसरा अंक सुरू होण्याआधीच अभिनयाचा हा ऋषी काळाच्या पडद्याआड गेला….

अलविदा! ऋषी कपूर

मुंबई=हिंदी चित्रपट सृष्टीचे कलाकार, चॉकलेट बॉय ऋषी कपूर यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी नीतू सिंग, मुलगा रणबीर, मुलगी रिद्दीमा असे कुटुंब आहे. अचानक त्रास होऊ लागल्याने बुधवारी मध्यरात्री ऋषी कपूर यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. ३० एप्रिल रोजी सकाळी ८.४५ वाजता यांनी अखेरचा श्वास घेतला.

दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा रणबीर कपूर यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले असून यावेळी कपूर कुटुंबियांसह काही जवळचे मित्रपरिवार स्मशानभूमीत उपस्थित होते. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलीवूडसह त्यांचे चाहते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कपूर कुटुंबिय उपस्थित
ऋषी कपूर यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठे बंधू रणधीर आणि राजीव कपूर सह पुतणी करिना कपूर, रणधीर यांची पत्नी बबीता, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट यांच्यासह काही मोजके सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. ऋषी कपूर यांची मुलगी रिधिमा ही दिल्लीत राहत असून वडिलांच्या निधनाची बातमी मिळतात त्यांनी लॉकडाऊनच्या परिस्थितीत परवानगी घेऊन रस्त्याच्या मार्गे मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. दरम्यान, हिंदू पद्धतीनुसार ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्काराचा विधी पार पडला. यावेळी पत्नी नीतू सिंग यांना अश्रू अनावर झाले होते. तर इतरही उपस्थितांचे डोळे पाणावले होते.