साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी

साताऱ्यात कॅलिफोर्नियाहून आलेल्या एका वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

coronavirus
कोरोना व्हायरस

साताऱ्यात कॅलिफोर्नियाहून आलेल्या एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. साताऱ्यातील हा पहिलाच बळी आहे. त्यामुळे साताऱ्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते

सातारा जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यातील एक रुग्ण हा कॅलिफोर्नियाहून आला होता. या दोन्ही रुग्णांचे १४ दिवसानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यानुसार आज पुन्हा १५ व्या दिवसांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार होते. परंतु, त्या आधीच या ६३ वर्षीय रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडकरी यांनी दिली. हा व्यक्ती सातारा जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वसंतनगर येथे राहत होता.

दरम्यान, या व्यक्तीचे प्राथमिक रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांना देखील क्वॉरंटाइन करण्यात आले होते. तसेच कॅलिफोर्नियाहून आल्यानंतर तो ज्यांच्या संपर्कात आला होता, त्या सर्वांचा शोध घेण्यात येत असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


हेही वाचा – मध्य आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांच्या जेवणाची चव जाणार