घरCORONA UPDATEदिलासादायक बातमी : नगरमधील पहिला बाधित रुग्ण कोरोनामुक्त; रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

दिलासादायक बातमी : नगरमधील पहिला बाधित रुग्ण कोरोनामुक्त; रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

Subscribe

अहमदनगरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णाचे चौदा दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण करोनामुक्त झाला.

अनंत पांगारकर, अहमदनगर

अहमदनगरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णाचे चौदा दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण करोनामुक्त झाला. आरोग्य यंत्रणेच्या पुढील तपासण्या झाल्यानंतर रविवारी सकाळी या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. यामुळे आता नगरमध्ये केवळ दोन कोरोनाबाधीत रुग्ण शिल्लक राहिले आहे. रविवारी पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाला घरी सोडल्यानंतर पुन्हा चौदा दिवस देखरेखीखाली ठेवले जाणार असून आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा झाला, ही दिलासादायक बाब असल्याचे नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

- Advertisement -

द्विवेदी यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे. आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांनी मोठे कष्ट घेत कोराेना पॉझिटिव्ह तीन रुग्णावर उपचार सुरु ठेवले आहे, त्याची परिणती समोर येत आहे. पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला असून आता नगरमध्ये केवळ दोन रुग्ण उरले आहे. कोरोनामुक्त झालेल्या या व्यक्तीला जिल्ह्यात पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तात्काळ त्याला बुथ हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन कक्षात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारी त्याला चौदा दिवस पुर्ण झाल्यानंतर त्याचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविले होते. हा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा दुसरा स्त्राव तपासणीसाठी पाठविला गेला, त्याचा अहवाल शनिवारी रात्री प्रशासनाकडे प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री उशिराने याची माहिती माध्यमांना देत हि दिलासादायक बाब असल्याचे सांगितले. या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याचे आरोग्य विभाग आणि महापालिकेच्यावतीने स्वागत करण्यात आले.

 

- Advertisement -

अद्यापही तीस लोक आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली 

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील  २९७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून ३० व्यक्तींना आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली आहे. पुण्याच्या एनआयव्हीकडे २६९ जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यातील २४५ जणांचे स्त्राव नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सध्या घरीच देखरेखीखाली असणाऱ्या व्यक्तींची जिल्ह्यातील संख्या आता ३७४ झाली असून प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. कोरोना संसर्गाचा  प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणीसाठी येणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील तर त्यांचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -