पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या आजाराने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही हळूहळू वाढ होत आहे. अशात पुण्यानंतर आता
पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएस आजाराने पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृत व्यक्तीचं वय केवळ 36 असून, तो पिंपळे गुरव येथे राहणारा रहिवाशी होता. पिंपरी-चिंचवडमध्ये आत्तापर्यंत जीबीएसचे 13 रुग्ण आढळलेत, त्यातील हा पहिला बळी ठरला. (First gbs disease death in pune pimpri chinchwad)
मिळालेल्यामा माहितीनुसार, 21 जानेवारीला त्याला महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा करताना तब्येतीत जास्त बिघाड झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होता. मागील आठ दिवस त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले. मात्र काल (30 जानेवारी) त्याने अखेरचा श्वास घेतला. गुलेन बॅरी सिंड्रोम आजारामुळे हा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जीबीएसमुळं हा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
ससून रुग्णालयातही एका महिलेचा मृत्यू
पुण्यासह राज्यातील अन्य भागात सध्या गुलेन बॅरी सिंड्रोमच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा ‘जीबीएस’ने मृत्यू झाला. या आजारामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. संबंधित रुग्ण नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) नांदोशी येथील रहिवासी होत्या.
गुलेन बॅरी सिंड्रोम रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडून सिंहगड रस्ता परिसरातील जलस्राोतांसह खडकवासला धरणातील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यात ई-कोलाय आणि कॉलिफॉर्म हे जीवाणू आढळल्याने हे पाणी प्रक्रिया न करता पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
हेही वाचा – Devendra Fadnavis : दावोसमधील ‘त्या’ चिमुरड्याचा किस्सा सांगत फडणवीस म्हणाले, ‘मी पुन्हा येईन…’