“माझ्यासाठी आधी मनसैनिक बाकीचे नंतर”; एकनाथ शिंदेंचा गट मनसेत विलीन होण्याबाबत राज ठाकरेंचे उत्तर

एकनाथ शिंदे यांनी पक्षावर दावा केला असला तरी, त्यांना पक्षात फूट असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. परंतु, ते सिद्ध करण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरल्यास त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागले.

बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा केला आहे. सर्वाधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असल्याने शिवसेना नेमकी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून, येत्या १ ऑगस्ट रोजी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पक्षावर दावा केला असला तरी, त्यांना पक्षात फूट असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. परंतु, ते सिद्ध करण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरल्यास त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागले. त्यामुळे असे झाल्यास एकनाथ शिंदे आपला गट मनसेमध्ये सामिल करतील अशी चर्चा शिंदेंच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंनी “शिंदे गटाकडून तसा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू”, असे उत्तर दिले. (first mns workers then other raj thackeray talk on cm eknath shinde group add in mns)

शिवसेनेत पडलेली फुट आणि सध्या सुरू असलेल्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचा इतिहास सांगत, “शिवसेनेतून याआधीही अनेकजण बाहेर पडले. छगन भुजबळ, नारायण राणेंनी बंडखोरी केली. मात्र मी बंड केले नव्हते”, असे म्हटले.

“४० आमदारांचे विलिनीकरण हा तांत्रिक मुद्दा असून, मी अनेक वर्तमानपत्रांमध्ये याबाबत वाचले. त्या आमदारांकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव मी नक्कीच विचार करेन. तसेच “ते जरी पक्षात आल्यास माझ्यासाठी आधी मनसैनिकबाकीचे नंतर”, असे उत्तर राज यांनी दिलं.

“मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून पक्ष सोडला. त्यावेळी माझ्यासोबत काही मोजके नेते होते. बाळा नांदगांवकर त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले. नांदगांवकर त्यावेळी आमदार होते. ते सेनेच्या तिकिटावर निवडून आले होते आणि पक्षातून बाहेर पडल्यावर ते सेनेचा व्हिप पाळत होते. बाळासाहेबांच्या पक्षातून बाहेर पडून स्वत:चा पक्ष स्थापन करणे हे अत्यंत आव्हानात्मक होते आणि मी ते आव्हान पेलले. शिवसेनेतून अनेकजण सत्तेसाठी बाहेर पडले. इतर पक्षांमध्ये गेले. मी तसे केले नाही. मी स्वत:चा पक्ष स्थापन केला. त्यामुळे सेना सोडलेल्या इतर नेत्यांमध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे”, असं राज म्हणाले.


हेही वाचा – “मला उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या ठरावाचा पश्चाताप…”; राज ठाकरेंनी स्पष्ट केले शिवसेना फुटण्याचे कारण