शिंदे गटात पहिली वादाची ठिणगी; आमदार कांदे पालकमंत्री भुसेंवर नाराज

नाशिक : बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात सार काही आलबेल नसल्याचं समोर आल आहे. आमदार सुहास कांदे यांनी थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याने त्यांची खदखद समोर आली आहे. बैठकींना बोलवले जात नाही, पक्षाच्या नियुक्त्या परस्पर केल्या जातात’ अश्या पद्धतीची भावना कांदे यांनी व्यक्त केल्याने जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, कांदे यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यासह राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

‘मरेपर्यंत एकनाथराव संभाजी शिंदे’ या व्यक्तिसोबतच राहणार असे सांगतानाच आमदार कांदे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. याआधी पालकमंत्री राहिलेले गिरीश महाजन, छगन भुजबळ यांनी नेहमी आपल्या पक्षाच्या आमदारांना सोबत घेऊनच जिल्ह्यातील कुठल्याही बैठका केल्याचा इतिहास आहे. परंतु, मला कुठल्याही बैठकीला आमंत्रितच केल जात नाही किंवा कळवलेही जात नाही त्यामुळे पालकमंत्र्यांच्या बैठकीला जाणे योग्य नाही म्हणून मी जात नाही’ असे म्हणत कांदे यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यावर वयक्तिक प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे. नगरविकास मंत्री किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे तर एक व्यक्ति म्हणून माझ त्यांच्यावर प्रेम आहे. आणि त्या प्रेमाखातर मला मान अपमान सहन करावा लागेल, त्यासाठी मला दोन पाऊल मागे याव लागेल, त्यांच्यासाठी एमएलए काही त्याग करावा लागेल तरी माझी तयारी आहे. त्यांच्यावरील प्रेमापोटी हे सगळं सहन करण्याची तयारी ठेवतो. आणि माझ त्याच्यावरील हे प्रेम मरेपर्यंत टिकून राहील, असेही कांदे यावेळी म्हणाले. कांदे यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकरणात खळबळ उडाली आहे. याआधी छगन भूजबळ पालकमंत्री असतानाही कांदे यांनी निधि वाटपावरून थेट भुजबळांना अंगावर घेतलं होत. त्यावेळीही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

भुसेंनी कालच केली सावरासावर

१० सप्टेंबरला झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीनंतर आमदार सुहास कांदे हे कोणत्याही कार्यक्रम, अथवा बैठकांना दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये येऊन गेले, त्यावेळी कांदे या ठिकाणी उपस्थित नव्हते. याशिवाय शिंदे गटाच्या कार्यक्रमांना देखील कांदे फारसे दिसत नाहीत, शिंदे गटाच्या पदाधिकारी नेमणुका पक्षप्रवेश याठिकाणीही कांदेंची उपस्थिती दिसत नाही याबाबत माध्यम प्रतिनिधीनीं पालकमंत्री दादा भुसे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर प्रश्न केला असता.  ‘याबाबत कोणताही चुकीचा अर्थ न लावण्याची विनंती करतो, तसेच आम्ही एक दिलाने काम करीत आहोत कृपया कोणीही गैरसमज करू नये’ अश्या पद्धतीचे स्पष्टीकरण दिले होते. दुसर्‍याच दिवशी भुसे यांचा दावा कांदे यांनी खोडून काढल्यामुळे शिंदे गटात सगळ आलबेल नाही हे स्पष्ट आहे.