घरमहाराष्ट्रसंगणकाद्वारे परिक्षा देणारा राज्यातला पहिला विद्यार्थी

संगणकाद्वारे परिक्षा देणारा राज्यातला पहिला विद्यार्थी

Subscribe

बारावीच्या अनुराग ठोंबरेचे यश अनेकांसाठी प्रेरणादायी

मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही संकटावर मात करून यश मिळवता येते. याची प्रचिती अनुराग ठोंबरे या विद्यार्थ्याने बारावीच्या परिक्षेत मिळवलेल्या यशावरुन पुन्हा एकदा आली. लर्निंग डिसॅबलिटी (शिक्षण घेण्यात अडचण) असलेल्या अनुरागने बारावीच्या परिक्षेत ६३.५३ टक्के गुण मिळवले आहेत. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी रायटर न मिळाल्यामुळे संगणकावर प्रश्नपत्रिका सोडवून अनुरागने हे यश मिळवले आहे. संगणकाद्वारे परीक्षा देणारा अनुराग राज्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यातील १४,१६,९८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यापैकी ५ हजार ३७४ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. नवी मुंबई येथील महात्मा स्कूल ऑफ अकॅडेमिक अँड स्पोर्ट्स महाविद्यालयाचा अनुराग ठोंबरे या विद्यार्थ्यांपैकीच एक. अनुरागला लहानपणा पासूनच लर्निंग डिसॅबलिटीचा आजार आहे. त्याच्या आई वडिलांना याबद्दल कल्पना असल्याने त्यांनी त्याला आधीपासूनच टायपिंग शिकवले होते. पेन आणि पॅड नीट पकडता येत नसल्यामुळे त्याला आतापर्यंत रायटर पुरवला जात होता.

- Advertisement -

पण यावर्षी बारावीचे अत्यंत महत्त्वाचे वर्ष असूनही अनुरागला परिक्षेसाठी रायटर मिळत नव्हता. रायटरअभावी परिक्षा देता येणार नाही. अनुरागला संगणकावर पेपर सोडवण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्याच्या आई-वडिलांनी बोर्डाकडे केली. शिक्षण घेण्याचा हक्क सर्वांना मिळाला पाहीजे, या भूमिकेतून बोर्डानेही याप्रकरणाची तात्काळ दखल घेत अनुरागला संगणकावर उत्तरपत्रिका सोडवण्याची संधी उपलब्ध करून दिली. अनुरागनेही या संधीचा पुरेपूर वापर करत कलाशाखेतून ६३.५३ टक्के गुण मिळवले.

माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय मी आई-वडिलांना देतो. त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली. आई-वडीलांसोबत माझ्या शाळेचाही माझ्या यशामागे मोठा वाटा आहे.
– अनुराग ठोंबरे

एखाद्याला काही करायची जिद्द असेल तर तो त्यासाठी काहीही करू शकतो. याचे एक चांगले उदाहरण अनुरागने सिद्ध करून दाखवले आहे. अनुरागने आता पदवी आणि त्यापुढील उच्चशिक्षण घ्यावे, अशी आमची इच्छा आहे.
रोहिदास ठोंबरे (अनुरागचे वडील)

- Advertisement -

 

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल प्रेरणादायी

यावर्षी ५ हजार ३७४ दिव्यांग विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. यापैकी ४ हजार ९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. टक्केवारीत पाहता हा निकाल ९१.७८ टक्के इतका आहे. राज्याचा एकूण निकाल हा ८८.४१ टक्के असताना दिव्यांग विद्यार्थ्यांचा लागलेला निकाल सर्वच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -