सत्तांतरानंतर विधान परिषदेची पहिली निवडणूक, पण शिंदे गटाला स्थान नाही, भाजपाचा वरचष्मा

first Vidhan Parishad election after maharashtra political coup but Shinde group has no chance again

विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांसाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण उमेदवारांच्या निवडीपासून ते अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या काही क्षणापर्यंत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण, औरंगाबाद या पाच जागांवर या निवडणुकासाठी आज भाजप, महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी आपले अंतिम उमेदवार निश्चित केले. महाविकास आघाडी आणि घटक पक्षांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. यात भाजपनेही अंतिम उमेदवार शेवटच्या दिवशी निश्चित केले. पण या पाचही मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात उतरलेला नाही. राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषदेची ही पहिली निवडणूक आहे. यात भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीनंतरची ही दुसरी निवडणूक आहे. त्यावेळी देखील शिंदे गटाचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात पाहायला मिळाला नाही.

राज्यात शिक्षक पदवीधर निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीसाठी तीन नावं जाहीर केलं होती. तेव्हापासून या निवडणुकीवर भाजपचं वर्चस्व असल्याचे दिसले. कोकण शिक्षक मतदारसंघांतून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली, तर अमरावती पदवीधर मतदारसंघातून रणजीत पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांनी मैदानात उतरवले आहे. तर नागपूर शिक्षक मतदारसंघामधून भाजपने अपक्ष उमेदवार नागो गाणार यांना पाठींबा जाहीर केला आहे. पण नाशिकमधून भाजपने कोणताही थेट उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे या पाच मतदार संघात शिंदे गटाला एकही संधी मिळालेली नाही. मात्र भाजपकडून शिंदे गटाला डावलण्याची ही पहिली वेळ नाही.

यापूर्वी महाराष्ट्रातील शिवसेनेतील बंडखोरीमुळे राजकीय समीकरणं बिघडली होतीय. यावेळी नेमकी शिवसेना कोणाची ठाकरे गटाची की शिंदे गटाची हा संघर्ष सुरू झाला. यावेळी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली होती. या विनंतीची दखल घेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि शिंदे गटाला पोटनिवडणुकीसाठी वेगवेगळी नावं आणि चिन्हांना मान्यता दिली.

याचदरम्यान अंधेरी विधानसभेची पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली, तर शिवसेनच्या ठाकरे गटाने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. वस्तुत: ही जागा शिवसेनेकडे होती. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होते. शिवाय, आगामी महापालिका निडणुकांच्या दृष्टीने ती एक लिटमस टेस्ट होती.
भाजपाने जाहीर केल्या उमेदवारीवरून पक्षावर बरीच राजकीय टीका झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. मात्र यावेळीही शिंदे गटाने आपला एकही उमेदवार जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. याउलट शिंदे गटाने भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला. या मुद्द्यावरुन शिंदे गटावर बरीच टीका झाली. धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने आम्ही अंधेरी निवडणुकीत उमेदवार न देता भाजपच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याचे शिंदे गटाने म्हटले होते. मात्र या निवडणुकीतही भाजपने शिंदे गटाला साईडलाइन करत ठाकरे गटाविरोधात आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला होता.


विधान परिषद पदवीधर – शिक्षक निवडणूक; अंतिम उमेदवार ठरले, अशी असेल लढत…