Homeमहाराष्ट्रकोकणFish Producton : कोकणातील मासे कुणी खाल्ले, मत्स्य उत्पादनात महाघट

Fish Producton : कोकणातील मासे कुणी खाल्ले, मत्स्य उत्पादनात महाघट

Subscribe

पनवेल : राज्यातील मत्स्य उत्पादन 2023-24 मध्ये 3 लाख 64 हजार 288 मेट्रिक टन झाले आहे. 2022-23 मध्ये मत्स्य उत्पादन 4 लाख 46 हजार 256 मेट्रिक टन झाले होते. म्हणजेच वर्षभरात मत्स्य उत्पादनात जवळपास 82 हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. गंभीर बाब म्हणजे 2023-24 मध्ये पाच वर्षांतील सर्वात कमी मत्स्य उत्पादन झाले आहे. यामुळे छोट्या मच्छीमारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

जबाबदार घटक

कोकणातील कंपन्या, कारखान्यांचे सांडपाणी थेट समुद्रात सोडल्याने मोठे प्रदूषण होत आहे. शिवाय वातावरणातील बदलाचा मत्स्य उत्पादनावर परिणाम होत आहे. एलईडी दिव्यांच्या मदतीने पर्ससीन नेटचा वापर करून केलेली मासेमारी, किनारपट्टीवर घोंगावणारी वादळे यामुळेही मत्स्य उत्पादन घटत आहे. आपल्याकडे पावसाळ्यात प्रजनन काळात मासेमारी बंद असते. या काळात दुसऱ्या राज्यातील बोटी मासेमारी करून पसार होतात. त्यामुळेही मत्स्य उत्पादनात मोठी घट होत आहे.

सरकारने काय करायला हवे?

माशांच्या प्रजनन काळात सर्वांनाच मच्छीमारी बंद करायला हवी. तसे केल्यास मत्स्य उत्पादन वाढेल. एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारीवर नियंत्रण ठेवावे तसेच यांत्रिक बोटी तसेच पर्ससीन नेटचा वापर करणाऱ्या बोटी त्यांना आखून दिलेल्या सीमेचा वापर करत आहेत का, यावर नियंत्रण गरजेचे आहे.

‘या’ माशांचे उत्पादन घटले

पाच वर्षांत पापलेट, शेवंड, शिंगाडा, सुरमई, घोळ, करंदी, बगा या सारख्या माशांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. बोंबीलदेखील पूर्वीच्या तुलनेत कमी मिळत आहेत. समुद्रातून खाडीमार्गे थेट भातशेतात आढळणारे जिताडे मासे आता दुर्मिळ झाले आहेत. खाडीपट्ट्यातील अनेक मत्स्यप्रजाती आता नष्टच झाल्या आहेत. पूर्वी किनारपट्टीजवळ मुबलक मासे मिळत होते. आता खोल समुद्रात जाऊनही मासे मिळत नसल्याची मच्छीमारांची तक्रार आहे. मासेमारीचा खर्च वाढला असून त्या तुलनेत मच्छी मिळत नाही. शिवाय पावसाळ्यातील दोन ते तीन महिने मासेमारी बंद असल्यामुळे मच्छीमारदेखील हताश झाले आहेत.

मत्स्य उत्पादन (2023-24)

  • रायगड – 28 हजार मेट्रिक टन
  • रत्नागिरी – 69 हजार मेट्रिक टन
  • मुंबई – 1 लाख 38 हजार मेट्रिक टन
  • मुंबई उपनगर – 61 हजार मेट्रिक टन
  • ठाणे-पालघर – 49 हजार मेट्रिक टन
  • सिंधुदुर्ग – 17 हजार 976 मेट्रिक टन

    मत्स्य उत्पादन : 2023-23

    4 लाख 46 हजार 256 मेट्रिक टन

    मत्स्य उत्पादन : 2023-24

    3 लाख 64 हजार 288 मेट्रिक टन

    एकूण घट – 81 हजार 968 मेट्रिक टन

(Edited by Avinash Chandane)