घरमहाराष्ट्रपुण्यात पावसाचा कहर; १२ जणांचा मृत्यू

पुण्यात पावसाचा कहर; १२ जणांचा मृत्यू

Subscribe

पुणे शहराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून या पावसामुळे १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुणे शहराला गुरुवारी मध्यरात्री अक्षरश: पावसाने झोडपून काढले आहे. या मुसळधार पावामुळे भिंत कोसळल्याची घटना घडून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्याच्या टांगेवाली कॉलनी परिसरात घडली असून या ६ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यातील चौघांची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. रोहित भरत आमले (१३) संतोष कदम (५५) सौंदलीकर (३२) आणि त्यांचा ९ वर्षाचा मुलगा यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

आंबील ओढ्याचे रौद्ररुप

बुधवारी रात्री पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तीन तासात वेधशाळेने ५१ मिलिमीटर पावसाची नोंद केली आहे. तर महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात १०६ मिमी पाऊस झाला आहे. कात्रज येथे उगम पावणाऱ्या आंबील ओढ्याने रौद्र रूप धारण केले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कलवर्ट आणि संरक्षण भिंत फोडून पाणी आजूबाजूच्या परिसरातील घरात, गृह सोसायटीत वेगाने घुसले.

- Advertisement -

नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

कात्रज, कोल्हेवाडी, बिबवेवाडी , सिंहगड रस्ता वारजे कर्वेनगर दांडेकर पूल आदी भागातही पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले. पाण्याच्या वेग इतका जोरात होता की त्यात चारचाकी, दुचाकी वाहने वाहून गेली. पाणी तुंबल्याने अडकून पडलेल्या ५२५ नागरिकांना अग्निशामक दल आणि एनडीआरएफ च्या मदतीने बाहेर काढण्यात आले. तर खबरदारीचा उपाय म्हणून ३ हजार ५०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

पाणी आणि वीज पुरवठा खंडित

आंबील ओढ्याच्या पुराचे पाणी पद्मावती पम्पिंग स्टेशन मध्ये शिरल्याने येथील पंप, मोटार नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे दक्षिण पुण्यात पुढील पाच दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. हे पम्पिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आणखी ४-५ दिवसांचा अवधी आणि काही कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा हा पुढील आठवडाभर विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्री १ वाजता पंप सुरू होईल असा दावा प्रशासन करीत असले तरी तेवढे पम्पिंग पुरेसे ठरणार नाही. जोरदार पावसामुळे शहर आणि जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. तो वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची यंत्रणेचे काम सुरु आहे. बिबवेवाडी, कोंढवा, येवलेवाडी, कात्रज, आंबेगाव, सिंहगड रस्ता आदी भागात वीज पुरवठा दिवसभर खंडित होता. काही भागात रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र बहुतांशी भाग हा अंधारातच राहिला.

- Advertisement -

खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान

महापालिकेच्या आपत्कालिन विभागाकडे सातत्याने नागरिक संपर्क साधत होते. पाणी तुंबल्याच्या आणि घरात, वस्तीत पाणी शिरल्याच्या ८०हून अधिक तक्रारी या विभागाकडे आल्या होत्या. सहकार नगर भागातील आंबेडकर वसाहतीत पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. पुराच्या पाण्यामुळे ५०हून अधिक चारचाकी वाहने या पाण्यात वाहून गेली. तर १००हून अधिक दुचाकी पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. परंतु यापेक्षा अधिक चार चाकी वाहनांना या पुराचा फटका बसला आहे. अनेक सोसायटीतील पार्किंग मध्ये असलेली चार चाकी वाहने पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाली होती. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे कात्रज, बिबवेवाडी, अप्पर, इंदिरानगर, सहकारनगर आदी भागातील नाल्या लगत असलेल्या घरातील दैनंदिन जीवनाच्या गोष्टी पाण्यात वाहून गेल्या. घरातील भांडी, फ्रिज अशा वस्तूंचा देखील यात समावेश आहे. महत्त्वाची कागदपत्रे, शालेय साहित्य देखील पाण्यात भिजून खराब झाले आहेत.

आणखी चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता

पुढील आणखी चार दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने अत्यावश्यक ती उपाययोजना केली आहे. बाधित ५ प्रभागात २५०हून अधिक कर्मचारी अहोरात्र नियुक्त करण्यात आले आहेत. अग्निशामक दल, एनडीआरएफ यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बारामती शहराला सर्वाधिक फटका

पुणे शहराच्या दक्षिण भागाप्रमाणेच जिल्ह्यातील खेड शिवापुर, नारायणपूर, कापूरहोळ आदि भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कऱ्हा नदीला पूर आला. या नदीवरील नाझरे हे धरण भरल्याने त्यातून सुमारे प्रतिसेकंद ११ हजार ५०० क्युसेक गतीने पाणी नदीत सोडले जात आहे. याचा परिणाम नदीच्या काठावर असलेल्या गावात पूरस्थिती निर्माण झाली. सर्वात जास्त फटका बारामती शहराला बसला असून शहरात नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. सासवड ते जेजुरी या मार्गावर सासवड येथे नदीवरील पूल खचला असून त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -