रायगडमध्ये दरड कोसळून ५ जणांचा मृत्यू; ५ जण अजूनही ढिगाऱ्याखाली

Landslide

रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाचजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. याबाबतची माहिती रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. राज्यात अतिवृष्टीने काल (गुरुवारी) हाहाकार माजवला. रायगड, चिपळूण, महाड आदी ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकलेले आहेत.

रायगड, चिपळूण, महाडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक भागांमध्ये दरड कोसळली आहे. रायगडमधील सुतारवाडी परिसरात दरड कोसळी आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, दरड कोसळल्याने तसंच अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने मदत पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे.

महाड एमआयडीसी मधील कारखान्यात रात्री स्फोट

रायगडमधील महाड MIDC मधील कारखान्यात रात्रीच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. विनती ऑरगॅनिक कारखान्यात आग लागली होती. त्यानंतर आज पहाटे पुन्हा आणखी एका कंपनीत आग लागल्याची घटना घडली. अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील कारखाने बंद असताना आगीमुळे लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

महाडमध्ये दरड कोसळली, ३० घरे मातीखाली

महाडमध्ये गुरुवारी दरड कोसळून ३० घरे मातीखाली दबल्याची घटना घडली. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अतंरावर ही घटना घडली. या घटनेत ३० घरे गाडली गेल्यामुळे यामध्ये एकूण ७२ नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थिती असून दुर्घटनेच्या ठिकाणचा सपंर्क तुटला आहे.