ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये पाच वाहनांना आग, शॉर्टसर्किटची शक्यता

ठाणे : वर्तकनगर येथे बिल्डिंग क्रमांक – 41 समोरील मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या पाच वाहनांना आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोन चारचाकी, दोन रिक्षा आणि एक दुचाकीचा समावेश आहे. यामध्ये पाचही वाहनांचे नुकसान झाले असून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

वर्तकनगर बिल्डिंग क्रमांक – 41 समोरील मोकळ्या जागेत उभ्या केलेल्या वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेत, तातडीने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास 20 मिनिटांचा कालावधी लागला. तोपर्यंत या आगीत चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा पाच वाहनांचे नुकसान झाले आहे.

ही आग नेमकी लागली की कोणी लावली, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र एखाद्या वाहनामध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. एका वाहनाने पेट घेतल्यानंतर त्याची झळ इतर वाहनांना बसल्याने त्या वाहनांनी ही पेट घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

ठाण्यात आठवड्याभरात आगीची दुसरी घटना
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका या ठिकाणी श्री साई प्युअर व्हेज या एक मजली हॉटेलला गेल्या बुधवारी (15 फेब्रुवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. ही आग जवळपास सव्वा तासांनी पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या आगीमुळे हॉटेल्समध्ये अडकलेल्या तिघा कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणाच्या हाताला, कोणाच्या चेहऱ्याला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती.

नाशकात शुक्रवारी अग्नितांडव
नवीन नाशिकच्या चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेजवळील भंगार दुकानाला शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण आग लागली होते. भंगारात रबर, टायर व प्लास्टिक इत्यादी सामग्रीचा समावेश मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीमुळे सिलिंडरच्या स्फोटासारखे आवाज झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. आगीत पंचवीस ते तीस दुकाने जळून खाक झाली.