अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर, कोणाला किती मदत ?

CM Uddhav Thackeray and LOP Devendra Fadnavis jointly inspected the flood-hit Kolhapur

राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांसाठी आणि पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारने आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला. ठाकरे सरकारने या दोन्ही नुकसानग्रस्तांसाठी १० हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. जिरायती जमीनीसाठी प्रति हेक्टर दहा हजार रूपये तर बागायती जमीनीसाटी प्रति हेक्टर १५ हजार रूपयांचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावीत अतिवृष्टीत तसेच पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाले. त्यासाठीचे अर्थसहाय्य म्हणून या नैसर्गिक संकटात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेतील ठाकरे सरकारने आज जाहीर केले.

महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या निकषाच्या पुढे जात राज्यातील शेतकरी तसेच नुकसानग्रस्तांसाठी निर्णय घेतला असल्याचे दादाजी भुसे यांनी सांगितले. अतिवृष्टीचा किंवा पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना केंद्राच्या निकषानुसार जिथे प्रति हेक्टर ६ हजार ८०० रूपये इतकी मदत घोषित होते, तिथे महाविकास आघाडी सरकारने १० हजार रूपये जिरायती जमिनीसाठी हेक्टरी मदत देऊ केल्याचे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले. तर बागायती जमिनीसाठी हेक्टरी १५ हजार रूपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने ही वाढीव मदत देण्याचा ठराव संमत झाल्याचेही ते म्हणाले. याबाबतचा शासन निर्णय लवकरच अपेक्षित असून शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही ते म्हणाले. केंद्राच्या एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता राज्य सरकारने ही मदत जाहीर केली आहे.