घरमहाराष्ट्रपावसाची विश्रांती मात्र पुराचा विळखा कायम

पावसाची विश्रांती मात्र पुराचा विळखा कायम

Subscribe

गेल्या चार दिवसांच्या अतिवृष्टीनंतर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना दिलासा

गेल्या चार दिवसांच्या अतिवृष्टीनंतर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत रविवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र, या अतिवृष्टीने नद्यांना आलेले पूर आणि त्यातच धरणातून होणार्‍या विसर्गामुळे सांगली आणि कोल्हापूरभोवतीचा पुराचा विळखा कायम होता. पावसाने विश्रांती घेतल्यास रविवारी रात्रीपासून या पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांसह स्थानिक प्रशासनाने शनिवारी मोठी मोहीम उघडत हजारोंना सुरक्षित स्थळी हलवले.

गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. धरण, नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील पंचगंगा नदीची ४३ फूट ही धोकापातळी आहे. ती आज सकाळी ६० फुटांवर होती. यामुळे कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसले. यामुळे हजारो घरांमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी साचले. या घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांची रविवारी ‘एनडीआरएफ’च्या एकूण ९ तुकड्या आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सुखरूप स्थळी सुटका करण्यात आली.

- Advertisement -

सांगलीमध्येही पावसाने उसंत घेतली तरी सांगली शहरासह वाळवा, मिरज, पलूस, शिराळा तालुक्यांतील १०४ गावांची महापुराशी झुंज चालू आहे. सांगलीमध्ये पाण्याची पातळी ५२ फुटांपर्यंत जाऊन स्थिरावण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली असून लाखाहून अधिक नागरिक स्थलांतरित झाले आहेत. नदीकाठच्या बहुसंख्य गावांतील वीजपुरवठा खंडित झाला असून पूरबाधित क्षेत्रातील समस्या गंभीर बनली आहे. सातारा जिल्ह्यात पावसाने आज विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात या अतिवृष्टीने झालेल्या विविध दुर्घटनांच्या ठिकाणी मदतकार्यास वेग आला. जिल्ह्यात तब्बल १२ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये अद्याप १८ जण मरण पावले आहेत. जिल्ह्यातील कृष्णा, वेण्णा, कोयना नद्या अद्याप पात्राबाहेर वाहत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -