घरमहाराष्ट्रपुराच्या पाण्यामुळे विंचू, सर्पदंश यांचे रुग्ण वाढण्याची शक्यता, आरोग्य पथकांची नेमणूक

पुराच्या पाण्यामुळे विंचू, सर्पदंश यांचे रुग्ण वाढण्याची शक्यता, आरोग्य पथकांची नेमणूक

Subscribe

गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर आल्याने गावंच्या गावं पाण्याखाली गेली, यामुळे हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर शेकडो निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले. आता अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरत आहे. मात्र या महापूरानंतर इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकार योग्यती पाऊले उचलत आहे. या महापूराचा सर्वाधिक फटका राज्यातील सहा जिल्ह्यांना बसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक जिल्ह्यात महापूरानंतर आरोग्य़ाच्या गंभीर समस्या निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पूरामुळे आरोग्याचा समस्या उद्भवत असतात. त्यामुळे आरोग्य पथकाकडून पाण्यामुळे होणाऱ्या आणि इतर आजारांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. तसेच गरोदर महिला आणि बालकांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

अनेक वस्त्यांमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढले

दरम्यान पुराच्या पाण्यामुळे विंचू, साप यांचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. पुराच्या पाण्यात वाहून मानवी वस्तीत आलेल्या सापांचे प्रमाण अधिक आहे. अनेक वस्त्यांमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे विंचू, सर्पदंश यांचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही काळजी घेण्याचा सुचना देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

 पूरग्रस्त भागांत रोग नियंत्रणात आणणे मोठे आव्हान

महापूर ओसरल्यानंतर त्या भागांत आरोग्य यंत्रणेसमोर रोग नियंत्रणात आणणे हे मोठे आव्हान असणार आहे. यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, पुर ओसरल्यानंतर आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यादृष्टीने आपत्कालीन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर ४९६ गावांमध्ये रिलिफ कॅम्प उभारले आहेत. यामध्ये एक डॉक्टर, २ नर्स आणि चार आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम असणार आहे. तसेच सध्या किटक नाशक, जंतू नाशक फवारणी केली जात आहे. किटक नाशकांच्या फवारणीसह पाण्याचे नमुने तपासून घेतले असून पाण्याचं शुद्धीकरण करण्याचं कामही सुरु आहे.

- Advertisement -

तसेच आरोग्य विभागाला औषध खरेदी करण्यासाठी १० लाखांचा निधी देण्यात आलीची माहिती राजेश टोपे यांनी दिली. लेप्टो आजार वाढू नये यासाठी प्रत्येक पूरग्रस्त गावांत औषधे दिली जात आहेत. आरोग्य विभागाकडून आवश्यक असलेल्या ठिकाणी मदतकार्य सुरु आहे. खासगी रुग्णालयातही आरक्षित बेड ठेवण्याची व्यवस्था केली असल्याचेही टोपे यांनी सांगितले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -