घरमहाराष्ट्रमराठी भाषा टिकवण्यासाठी 'हे' साधे पाच नियम पाळाच!

मराठी भाषा टिकवण्यासाठी ‘हे’ साधे पाच नियम पाळाच!

Subscribe

मराठी भाषा जनमाणसांत प्रवाही ठेवायची असेल तर तिचा नित्यनिमयाने वापर व्हायला हवा. आज जगभर मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने काही सोपे, साधे नियम पाळून आपण आपली मराठी भाषा आणखी समृद्ध करूयात! 

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी... हे मराठी भाषेचे अभिमान गीत. पण गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेची होत असलेली गळचेपी पाहता पुढची किती वर्षे आपण मराठीत संवाद साधू शकू? असा प्रश्न भाषाअभ्यासकांपुढे निर्माण झाला आहे. प्राचीन काळापासून नदीप्रमाणे वाहत आलेली ही मराठी भाषा जगातील समृद्ध भाषेपैकी एक आहे. मात्र, तरीही या भाषेला अद्यापही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. परंतु, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याआधी ही भाषा जनमाणसांत टिकणे गरजेचे आहे. त्यासाठी ती प्रवाही ठेवावी लागेल. मराठी भाषा जनमाणसांत प्रवाही ठेवायची असेल तर तिचा नित्यनियमाने वापर व्हायला हवा. आज जगभर मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने काही सोपे, साधे नियम पाळून आपण आपली मराठी भाषा आणखी समृद्ध करूयात!

सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेचा वापर करा

- Advertisement -

देशाच्या आर्थिक जडणघडणीत महाराष्ट्राचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्यामुळे देशातील कानाकोपऱ्यातून लोक येथे वास्तव्यास येत असतात. महाराष्ट्रातील अनेक मोठी शहरं आता बहुभाषिक शहरं झाली आहेत. त्यामुळे सामान्य माणसासाठी सर्वपरिचीत भाषा म्हणून हिंदी किंवा इंग्रजीचा वापर केला जातो. यामुळे मराठी भाषा साहजिकच मागे पडते. अशावेळी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मराठीचा आग्रह धरलात तर इतर राज्यातून आलेले परभाषिक लोकही मराठी भाषा शिकण्यास प्रवृत्त होतील आणि किमान मराठी बांधवांशी तरी मराठीतून संवाद साधतील. अशावेळी भाजी मंडईत, मासळी बाजारात, दुकानात, रस्त्यांवर, प्रवासात जिथे शक्य होईल तिथे फक्त मराठी भाषेचाच वापर करा. जेणेकरून आपल्या भाषेचा प्रचार आणि प्रसार होईल.

तंत्रज्ञानात मराठी भाषा अवगत करा

- Advertisement -

अनेक सार्वजनिक ठिकाणी विविध तांत्रिक सुविधांचा वापर करताना आपण सोयीची अशी इंग्रजी भाषा निवडतो. त्यामुळे अशाठिकाणी मराठीची गळचेपी होते. साधं उदाहरण द्यायचं झालं तर एटीएममधून पैसे काढताना इंग्रजी भाषेचा पर्याय न निवडता मराठी भाषेचा पर्याय निवडावा. अशावेळी एटीएममध्ये एखाद्या वाक्याचे, संज्ञेचे चुकीचे मराठी अनुवाद झाले असेल तर तसे संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून द्यावे. यामुळे मराठीची गळचेपी थांबेल आणि चुकीच्या मराठीचा प्रसारही थांबेल.

मराठी भाषा ज्ञानभाषा करा

गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यम शाळांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनुदानित, विनाअनुदानित, सरकारी मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचा पायाच कच्चा राहत आहे. मातृभाषेत शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. कठीण विषयातील मुलभूत गोष्टी कळण्यास मदत होते. परिणामी विद्यार्थी आपल्या भाषेत सहजपद्धतीने अभ्यास करू शकतात, असं शिक्षणतज्ज्ञांचंच मत आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीलाही मराठी भाषेतून शिक्षण दिल्यास आपली भाषाही जिवंत राहील आणि भाषेसह शिक्षणाचा दर्जाही उंचावेल. जर तुमचा पाल्य इंग्रजी माध्यमात शिकत असेल तर निदान घरी तरी त्याच्याशी मराठीत संवाद साधा. जेणेकरून आजच्या पिढीच्या ओठांवर तरी मराठी भाषा जिवंत राहील.

मराठीतूनच सुविधा घ्या

गेल्या काही दिवसांपासून दूरसंचार (टेलिकम्युनिकेशन) विभागाचा विस्तार झाला आहे. यामुळे विविध खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी (Customer Care Executive) त्यांच्या उत्पादन आणि सेवा विक्रीसाठी तुम्हाला फोन करत असतात. किंवा ग्राहक म्हणून आपल्या अडचणी सोडवण्याकरता आपण विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत असतो. अशावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी मराठीत बोला. किंबहुना मराठी बोलता येणाऱ्या प्रतिनिधींशीच संवाद साधण्याचा आग्रह धरा. जेणेकरून कंपन्यांकडून मराठी बोलता येणाऱ्या प्रतिनिधींची नियुक्ती केली जाईल.त्यामुळे मराठी बेरोजगार तरुणाला नोकरी मिळू शकेल आणि आपली भाषाही प्रवाही राहील.

समाज माध्यमावर मातृभाषेत व्यक्त व्हा

विविध मुद्द्यावंर व्यक्त होण्याकरता समाज माध्यम (Social Media) हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. या माध्यमावरून व्यक्त होताना आपल्या मातृभाषेचा वापर करा. जेणेकरून मातृभाषेतील वाचन वाढेल. मराठी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल आणि पुन्हा एकदा वाचकांना मराठी वाचनाची गोडी निर्माण होऊ शकेल.

वर दिलेले साधे-सोपे नियम आपण पाळल्यास मराठी भाषेविषयी निर्माण झालेली भिती दूर होऊ शकते. मराठी भाषेला प्राचीन इतिहास आहे. त्यामुळे ती सहजासहजी नक्कीच मरणार नाही. परंतु, कोणतीही भाषा जिवंत राहण्याकरता तिचा वापर होणं गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांत अनेक बोलीभाषा नष्ट झाल्या आहेत. हीच परिस्थिती आपल्या मराठी भाषेवर येऊ नये याकरता साध्या सोप्या नियमांचा वापर केल्यास मराठी भाषा कायम प्रवाहीत राहील. आणि महाराष्ट्राप्रमाणेच सुजलाम सुफलाम होईल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -