मुंबई – महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वात पहिली नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून समोर आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामागे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी राजीनामा देण्याचा दबाव वाढला आणि अखेर तीन महिन्यांनी, 4 मार्च रोजी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. मुंडेंच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन शब्दात प्रतिक्रिया दिली. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला, असे ते म्हणाले. धनंजय मुंडेचा राजीनामा होऊन आता आठ दिवस झाले आहेत, मात्र धनंजय मुंडेंची जागा राष्ट्रवादीने भरलेली नाही. अन्न आणि नागरी पुरवठा खाते कोणाकडे जाणार याची चर्चा आता सुरु झाली आहे.
धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आता आठ दिवस झाले आहेत. या दरम्यानच्या काळात राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी मोठी लॉबिंग सुरु झाली आहे. धनंजय मुंडे हे मराठवाड्यातील असल्यामुळे त्यातही बीडमध्ये अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत. त्यांच्याकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद बीडमध्येच राहावे यासाठी जोरदार लॉबिंग केली जात आहे. अजित दादा गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजलगाव मतदारसंघातील आमदार प्रकाश सोळंके आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. मराठा आमदाराला मंत्रीपदाची संधी द्यावी अशीही पक्षात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
अजित पवार काय निर्णय घेणार?
धनंजय मुंडे हे ओबीसी नेते आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आलेले छगन भुजबळ हे राज्यातील मोठा ओबीसी चेहरा आहेत. भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचीही मागणी होत आहे. कोणालाही मंत्रिपद दिले तरी पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद स्वतःकडेच ठेवण्याचे ठरवले असल्याचीही माहिती आहे.
हेही वाचा : Vidhan Parishad Election : भाजपकडून 3 नावे पक्की; माधव भंडारींना निष्ठेचे फळ मिळण्याची शक्यता
विधान परिषदेच्या एका जागेवरही नाव निश्चित नाही
येत्या 27 मार्च रोजी विधान परिषदेची पोटनिवडणूक आहे. पाच जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीतील एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. परभणीतील राजेश विटेकर यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या एका जागेसाठी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर इच्छूक आहेत. तर पक्षाच्या रुपाली ठोंबरे आणि विधानसभेत पराभूत झालेले झिशान सिद्दीकी देखील विधान परिषदेसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे ही जागा पुण्यामध्ये जाणार का, सिद्दीकींचे पुनर्वसन होणार, की मराठवाड्यालाच पुन्हा ही जागा मिळणार याचीही सध्या चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठीच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. येथेही पक्षांतर्गत नाराजी उफाळून येऊ नये याची काळजी अजित पवारांकडून घेतली जात आहे.