घरमहाराष्ट्रमावळमधून पूरग्रस्तांसाठी ५ लाख पुऱ्या, शेंगदाण्याची चटणी

मावळमधून पूरग्रस्तांसाठी ५ लाख पुऱ्या, शेंगदाण्याची चटणी

Subscribe

सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत मावळमधून कोल्हापूर आणि सांगलीतल्या पूरग्रस्त भागांमध्ये जेवणाची पाकिटं पाठवली जात आहेत.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे गेल्या १० दिवसांपासून भयावह परिस्थिती आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत तर कित्येक जणांचे जीव पुराच्या पाण्याने घेतले आहेत. अशा संकटात सापडलेल्या नागरिकांना सामाजिक बांधिलकी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व स्तरातून मदत केली जात आहे. लाखो नागरिक रस्त्यावर आले असून त्यांना स्थलांतरित केले जात आहे. सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गेल्या दोन दशकात असा भयावह पाऊस झाला नसल्याचे नागरिक सांगतात. अशा वेळी पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातून पूरग्रस्तांसाठी जेवणाची पाकिटे पाठविली जात आहेत.

५ लाख पुऱ्या पूरग्रस्त भागामध्ये

मावळमधून तब्बल ५ लाख पुऱ्या आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी हे पाठविले जात असून दोन घास पूर परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तींच्या तोंडात जावेत, अशी अपेक्षा बाळगून मदत केली जात आहे. तीन टप्प्यांत ही जेवणाची पाकिटे पूरग्रस्त भागात पोहोचवण्यात येणार आहेत. ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे, तर समाजातील दानशूर व्यक्तींनी आपली जबाबदारी ओळखून मदत करण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. खारीचा वाटा आणि आपली नैतिक जबाबदारी ओळखून माणुसकीच्या नात्याने आपली सर्व कामे बाजूला ठेवून कोणत्याही क्षेत्रात पुणेकर मागे नाहीत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. खरंतर राज्यातून अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती जमेल ती मदत करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापूर पुरग्रस्तांना नाशिकमधून मदतीचा ओघ..

कोल्हापूर-सांगलीकरांचा संघर्ष सुरूच!

दरम्यान, कोल्हापूरच्या अनेक भागांतून बऱ्यापैकी पुराचं पाणी ओसरलं असून सांगलीतून मात्र अजूनही धिम्या गतीनं पाणी ओसरत आहे. यामध्ये पाऊस न पडल्यामुळे पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, आता खरा त्यांचा संघर्ष सुरू होणार आहे. पुराचं पाणी ओसरून गेल्यानंतर मोडून पडलेला संसार पुन्हा उभा कसा करायचा? सुरुवात कुठून करायची? आधी काय करायचं? असा प्रश्न तिथल्या अनेकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून येणाऱ्या मदतीमुळे कोल्हापूरकर आणि सांगलीकरांना काही प्रमाणात का होईना, पण दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -