‘गोवरमुक्त मुंबई’साठी पालिका सरसावली, लसीकरणातून साधणार लक्ष्य

measles

मुंबई – मुंबईतील कुर्ला, माटुंगा, चेंबूर, वांद्रे व मालाड येथे बालकांमध्ये गोवर/रुबेला आजाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेऊन मुंबईला डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर, रुबेला आजारंपासून मुक्त करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिका आरोग्य खात्याने ठेवले आहे. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या ९ व १६ महिन्यांच्या बालकांचे गोवर, रुबेला लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन मुंबई महापालिका आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.

तसेच, या दोन्ही लसीच्या मात्रा मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्र, दवाखाने, सर्वसाधारण रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये येथे मोफत उपलब्ध आहेत. गोवर व रुबेला या आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरणाची पहिली मात्रा बालकास ९ महिने पूर्ण झाल्यावर व दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यावर देणे गरजेचे असते.

हेही वाचा मुंबईतील कोळीवाड्यांचे सुशोभीकरण करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

कुर्ला, माटुंगा, चेंबूर, वांद्रे व मालाडमध्ये बालकांमध्ये गोवर/रुबेला आजाराचा संसर्ग मुंबई महापालिकेच्या कुर्ला, माटुंगा, चेंबूर, वांद्रे व मालाड या विभागात ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये गोवर/रुबेला आजाराचा संसर्ग वाढल्याचे आढळून आले आहेत.

तसेच एका बालकाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्या अनुषंगाने या विभागांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन गोवर, रुबेलाच्या संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित रुग्णांचे रक्ताचे तसेच लघवीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहे. सर्वेक्षणातील एकूण गोवर रुग्णांच्या संख्येपैकी सुमारे १० टक्के बालके ही अर्धवट लसीकरण झालेली व २५ टक्के बालके लसीकरण न झालेली आढळून आली आहेत. याची गंभीर दखल पालिका आरोग्य खात्याने घेतली आहे. या विभागांमध्ये अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. बालकांचे लसीकरण पूर्ण करून घेऊन महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती आरोग्य खात्यामार्फत करण्यात आली आहे.

हेही वाचा – अंधेरी-जोगेश्वरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

गोवर, रुबेला या आजाराचे डिसेंबर २०२३ पर्यंत निर्मूलन करण्याचे लक्ष्य

मुंबई महापालिका क्षेत्रात आरोग्य खात्यामार्फत नियमितपणे लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो. या लसीकरण कार्यक्रमात ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ, कावीळ, क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, गोवर, रुबेला, गालगुंड व रोटा व्हायरस-डायरिया, न्युमोनिया यासारख्‍या आजारांपासून व गर्भवती महिलांचे लसीकरण करुन नवजात बालकांना धनुर्वात आजारापासून संरक्षित करण्यात येते. सदर नियमित लसीकरण व पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे सन २०१४ पासून भारत पोलिओमुक्त झाला आहे. तसेच नवजात बालकांमध्ये धनुर्वात आजाराचे निर्मूलन झाले आहे. त्याचप्रमाणे, गोवर, रुबेला या आजाराचे डिसेंबर २०२३ पर्यंत निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवून त्यादिशेने वाटचाल सुरु आहे.

गोवरची लक्षणे

गोवर या आजारामध्ये बालकास ताप येऊन त्याला सर्दी, खोकला व अंगावर लालसर पूरळ येते. अर्धवट व लसीकरण न झालेल्या बालकांमध्ये या आजारामुळे पुढे होणारी गुंतागुंत गंभीर स्वरुपाची होऊ शकते. उदा. फुफ्फुस दाह, अतिसार, मेंदुचा संसर्ग तसेच गर्भवती स्त्रीला रुबेलाचा संसर्ग झाल्यास गर्भातील बाळामध्ये विकृती निर्माण होऊ शकते. पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांमध्ये अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची शक्यता नसते