राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांना राहावे लागणार ‘होम क्वारंटाईन’

यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद, तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या हातावर होम काँरंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम काँरंटाईनकरण्यात येते.

लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळूहळू सुरू झाल्याने आपापल्या राज्यात गेलेले परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. अशा सर्व कामगारांची योग्य नोंद थर्मल तपासणी करण्यात येवून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आपआपल्या राज्यात परत गेला होता. आता राज्यात शिथिलता देण्यात आल्याने राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपापल्या राज्यात गेलेले परप्रांतीय कामगार महाराष्ट्रात  मोठ्या संख्येने परतण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड सह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास साडे पंधरा हजार कामगार येत आहेत.  यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. त्या यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद, तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या हातावर होम काँरंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम काँरंटाईनकरण्यात येते. मुंबई मध्ये बेस्ट मार्फत पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

सर्वाधिक कामगार मुंबई-नवी मुंबईत

राज्यातील गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः ४ ते ५ हजार तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात अकरा ते साडे अकरा हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या मर्यादित रेल्वे सुरू असल्याने ही संख्या कमी आहे, पण आपल्याकडील उद्योगधंदे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत निश्चितच वाढ होईल. त्यावेळी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.