बीड – भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता आणि भाजपचा पदाधिकारी खोक्या उर्फ सतीश भोसले याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे त्याच्या शिरूर कासार गावात असलेल्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर हे घर अनधिकृतपणे बांधण्यात आले होतं, असा वनविभागाचा आरोप आहे. त्यामुळे आता वनविभागाने बुलडोझर कारवाई केली आहे. या आधी वनविभागाने नोटीस पाठवली होती. पण 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातही आता बुलडोझर कारवाई
खोक्या भोसलेला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला ट्रान्झिट रिमांडवर बीडकडे आणले जात आहे. त्याला बीडमध्ये आणण्यापूर्वीच त्याच्या घरावर बुलडोझर फिरला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर फिरवतात हे देशाने पाहिले आहे. खोक्याला उत्तर प्रदेशात पकडण्यात आले आणि त्याच्यावर बुलडोझर बाबा अर्थात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून होणाऱ्या कारावाईप्रमाणेच कारवाई झाली आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात इतरही आरोपींसोबत अशाच पद्धतीने कारवाई होणार का, असा सवाल केला जात आहे.

खोक्याच्या घरात वाळलेले मांस
खोक्या भोसले हा याचे घर हे वनविभागाच्या जमीनीवर असल्याचा आरोप आहे. त्याच्या घरावर दोन दिवसांपूर्वीच बीड पोलीस आणि वनविभागाने छापा टाकला होता. या धाडीमध्ये शिकारीसाठीचे साहित्य,काही धारदार शस्त्र आणि प्राण्यांचे वाळलेले मांस मिळाल्याचाही दावा वनविभागाने केला होता. खोक्याने शेकडो वन्य जीवांची शिकार केल्याचा आरोप होता आहे. हरिण, ससा, मोर यांची त्याने शिकार केल्याचा आरोप आहे. यासंबंधी त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, शेकडो प्राणी मारणे शक्य आहे का. माझ्यावर काहीही आरोप होत आहे, असा दावा त्याने केला होता.

हरणांची शिकार करायचा खोक्या भोसले?
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये मोठा हरणांचा कळप आहे, आणि या कळपाला संपवण्याचे काम सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या गँगने केले आहे. बावी गावातील ढाकणे यांच्या शेतीलगत असलेला डोंगर, या डोंगरांमध्ये हरण पाणी पिण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी येत होते. मात्र, त्याच हरणांना पकडण्यासाठी त्यांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळी लावत होती. असा आरोप होत आहे.
हेही वाचा : Ladki Bahin : लाडक्या बहीणींसाठी सामाजिक न्याय विभागावरच अन्याय; तब्बल 7 हजार कोटींचा निधी वळवला