वनविभागातील अधिकाऱ्यांनी हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणणे बंधनकारक, शासनाकडून परिपत्रक जारी

sudhir mungantiwar

राज्यातील वन विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी कार्यालयाशी संबंधित फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणणे बंधनकारक असल्याचे आवाहन राज्याच्या वन मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. परंतु वंदे मातरम म्हणणं हे ऐच्छिक असल्याचंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याधीही सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी आणि कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील अशी घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर राजकीय वर्तुळात देखील आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.

हॅलोऐवजी वंदे मातरम् याबाबतचा प्रत्यक्ष शासन आदेश (जीआर) जाहीर झाला आहे. हा जीआर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नाही तर केवळ सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीतील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.‌ इतकेच नाही तर दूरध्वनीवरील संभाषणावेळी हॅलोऐवजी वंदे मातरम् या शब्दाचा वापर करणे ऐच्छिक आहे. असे आवाहन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. महसूल आणि वन विभागाने काढलेले परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाचा संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे.

नवनियुक्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्याच दिवशी मोठी घोषणा केली होती. पण सरकारी कार्यालयात फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम बोलण्याच्या आदेशामुळे वाद रंगला होता. रझा अकादमीनं या आदेशाला विरोध दर्शवला आहे. वाढत्या विरोधानंतर सुधीर मुनगंटीवार आपण हॅलोऐवजी केवळ वंदे मातरम् हाच शब्द वापरा, असे म्हटले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

मुनगंटीवार म्हणाले होते की, रझा अकादमीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इंग्रजांनी किंवा विदेशातून आलेल्या हॅलो शब्दाऐवजी वंदे मातरम् शब्द वापरावा, हे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाचे सुरू केलेले अभियान आहे. एखादा व्यक्ती वंदे मातरम्च्या तोडीचा शब्द वापरत असेल किंवा राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही.


हेही वाचा : ‘हॅलो’ हा शब्द 18 व्या शतकातला; त्याचा अर्थ आश्चर्य व्यक्त करणे असा, सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांना टोला