घरमहाराष्ट्रठरलं एकदाचं; महाविकासआघाडीत सत्तेचे वाटप असे होणार

ठरलं एकदाचं; महाविकासआघाडीत सत्तेचे वाटप असे होणार

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तापेच आता लवकरच सूटणार आहे. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे सत्ता स्थापन करण्यासाठी एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील ‘६ जनपथ’ या निवासस्थानी सुमारे सहा तास बैठक झाली. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आज सकाळी दहा वाजता काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पुन्हा राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक झाली. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या माहितीनुसार शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १५ आणि काँग्रेसला १२ मंत्रीपदे मिळणार असल्याचे समजत आहे. उद्या (दि. २२ नोव्हेंबर) शुक्रवारी तीनही पक्षांचे नेते मुंबईत बैठक घेणार आहेत.

- Advertisement -

दर ४ आमदारांमागे १ मंत्रिपद?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या. तर भाजपला सर्वाधिक १०५ जागांवर यश मिळाले. मात्र, शिवसेना आणि भाजप यांच्यात बिनसल्यामुळी युती तुटली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची बार्गेनिंग पावर वाढली. विशेष म्हणजे काँग्रेसची भूमिका जास्त महत्त्वाची ठरली. काँग्रेसने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी दर ४ आमदारांमागे १ मंत्रीपद अशी अट ठेवली होती. त्यानुसार मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

भाजपसोबत फारकत घेतल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेसची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे राज्यातील बरेच नेतेमंडळी दिल्लीला आहेत. दिल्लीत एकीकडे संसदेचे अधिवेशन सुरु आहे तर दुसरीकडे त्याच दिल्लीत महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन व्हावे यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची खलबतं सुरु आहेत. बुधवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची सुमारे सहा तास संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापन व्हावे या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी देखील तयार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -