भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

दुपारी तीन वाजता पुणे-नगर रस्त्यावर शिरुर येथील बी. जे. कॉर्नर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर शिरुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

BABURAO PACHURNE
BABURAO PACHURNE

पुणेः महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी आणि इतर सदस्य आहेत. बाबुराव पाचर्णे यांनी जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडणूक लढवली. या जागेवरून ते दोनदा (2004 ते 2009 आणि 2014 ते 2019) आमदार म्हणून निवडून आले. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार यांची रुग्णालयात भेट घेतली होती.

गेल्या काही दिवसांपासून बाबुराव पाचर्णे हे शिरुरमधीलच एका रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत असतानाच त्यांची आज प्राणज्योत मालवली. दुपारी तीन वाजता पुणे-नगर रस्त्यावर शिरुर येथील बी. जे. कॉर्नर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर शिरुर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मतदारसंघात ते 1990 पासून लढत असून, ते संघर्ष योद्धा म्हणूनही ओळखले जातात. तसेच शिरुर लोकसभा मतदारसंघात येणारी लोकसभा निवडणूक लढवण्यासही ते इच्छुक होते. प्रकृती खालावल्यामुळे त वर्षभर अज्ञातवासात होते, त्यानंतर ते आता पुन्हा सक्रिय झाले होते. परंतु आता ते अनंतात विलीन झाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनीही त्याबद्दल दुःख व्यक्त केलंय.

शिरुर विधानसभेचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन दुःखदायक आहे. शिरुर तालुक्याच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९७८ साली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी दोन वेळा आमदारकी मिळवली. तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषदेतही त्यांनी उत्तम काम केले. आज त्यांच्या निधनामुळे शिरुर तालुक्याचा विकासपुरुष हरपल्याची भावना मनात येत आहे. पाचर्णे कुटुंबीयांप्रति सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!, अशी भावनाही राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केली.


हेही वाचाः ठाकरे गटाला पुन्हा धक्का, निवडणूक आयोगाकडून १५ दिवसांचीच मुदत