शिंदे गटातील माजी नगरसेविका ठाकरे गटात परतल्या; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा सेफ गोल

uddhav thackeray

ठाणे – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर अनेकजणांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे लाटेत अनेक आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन केले होते. सर्वाधिक मोठी फूट ठाण्यातून पडली होती. मात्र, आता शिंदे गटात गेलेल्या ठाण्यातील नगरसेविका पुन्हा ठाकरे गटात परतल्या आहेत.

हेही वाचा – मारहाण करून ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक

ठाण्यातील माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरिशेट्टी (Ragini Bhaskar Bairishetye) यांनी आज मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला. अनेक कार्यकर्त्यांसह त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी प्रसंगी शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर आणि असंख्य कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाण्यातील शेकडो नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. त्यामुळे ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले होते. राजन विचारे, केदार दिघे, अनिता बिर्जे यांच्यासह फार कमी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले. त्यामुळे ठाण्यातून पुन्हा उभं राहण्याकरता ठाकरे गटाला जोमाने प्रयत्न करावे लागणार आहेत. ठाण्यात आता पक्षबांधणीला सुरुवात केली असून रागिणी बैरिशेट्टी यांच्यानिमित्ताने सेनेला बळ मिळालं आहे. यामुळे ठाकरे गटात आनंदाचं वातावरण आहे.

हेही वाचा – शिवसेना मोठ्या ताकदीने उसळी घेईल, संजय राऊतांनी बांधला चंग