Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन; शिवसेनेने गमावला कट्टर शिवसैनिक

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन; शिवसेनेने गमावला कट्टर शिवसैनिक

Subscribe

मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Former Mayor of Mumbai Vishwanath Mahadeshwar passed away) महाडेश्वर यांच्या निधनाने ठाकरे गटामध्ये शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा फटका देखील बसला आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी 2017 ते 2019 या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून कारभार सांभाळला होता. त्याशिवाय ते शिक्षण समितीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.

हेही वाचा – सत्ता संघर्षाच्या निकाल विधानसभा अध्यक्षांच्या हाती?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात महाडेश्वर गावी गेले होते. त्यानंतर ते चार दिवसांपूर्वी मुंबईत परतले होते. पण काल (ता. 08 मे) रात्री अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तत्काळ व्हि. एन. देसाई या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले आहे. तर आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून अशा आनंदाच्या दिवशी त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विश्वनाथ महाडेश्वर यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताक्रूझ पूर्व (Santacruz), पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

विश्वनाथ महाडेश्वर हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. त्याचमुळे त्यांनी बंडखोरी झाल्यानंतर देखील ठाकरे गटातचं राहण्याचा निर्णय घेतला होता. सामान्य कार्यकर्त्यापासून ते मुंबईच्या महापौर पदापर्यंतचा त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. 2002 मध्ये महाडेश्वर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते सलग आणखी दोन वेळा म्हणजेच 2007 आणि 2012 मध्ये नगरसेवकपदी विजयी झाले होते. तर 2003 मध्ये त्यांच्यावर शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपावण्यात आली. महाडेश्वर हे महानगरपालिकेतील उच्चशिक्षित सदस्य होते. तर त्यांनी 2017 ते 2019 या कालावधीत मुंबईचे महापौर म्हणून देखील कामकाज पाहिले आहे.

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी केली. ज्यामुळे महाडेश्वरांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

याप्रसंगी, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, माजी मंत्री व विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी, प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व महाडेश्वर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार अनिल परब, संजय पोतनीस, सुनील शिंदे, विलास पोतनीस, भाऊ कोरगावकर, ऋतुजा लटके, मनीषा कायंदे, तसेच, माजी महापौर महादेव देवळे, मुंबई महापालिकेतील माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी महापौर श्रद्धा जाधव, विभागप्रमुख सुरेश पाटील, यशोधर फणसे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव आदींनी प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांचे अंत्यदर्शन घेतले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आमदार व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाने एका उत्तम वक्त्याला, शिक्षक व लोकप्रतिनिधीला गमावले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनामुळे राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ही राजकीय पोकळी भरून काढणे ठाकरे गटाला खूप जड जाणार आहे.

महाडेश्वरांची उणीव कायम जाणवणार

मुंबई महापालिकेचे माजी महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर ह्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. विश्वनाथ महाडेश्वर हे माझे चांगले मित्र होतेच, पण सभागृहातील एक अभ्यासू आणि विनम्र असे सहकारी होते. महाडेश्वरांची उणीव कायम जाणवत राहील. विश्वनाथ महाडेश्वरजींना भावपूर्ण श्रद्धांजली-  रवी राजा, माजी विरोधी पक्ष नेते, मुंबई महापालिका

मुंबईच्या डबेवाल्यांची श्रध्दांजली

विश्वनाथ महाडेश्वर सर जेव्हा मुंबईचे महापौर होते त्या वेळी, रेल्वे स्टेशनबाहेर डबेवाल्यांचा सायकल पार्किंगचा प्रश्न उद्भवला असता ज्या ज्या रेल्वे स्टेशनबाहेर मुंबई महापालिकेची जागा असेल तर ती जागा डबेवाल्यांना सायकल पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या प्रमाणे काही रेल्वे स्टेशन बाहेर डबेवाल्यांना सायकल पार्किंगसाठी जागा उपलब्द झाली. काही ठिकाणी रेल्वेची जागा होती. तेथे ते रेल्वे अधिकारी यांच्याशी संपर्क साधत होते व त्यांना जागा देण्याबाबत विनंती करत होते डबेवाल्यांना सायकल पार्किंगसाठी अशा प्रकारे विश्वनाथ महाडेश्वर सरांनी मदत केली होती. त्यांच्या निधनाने आम्हाला दुःख झाले आहे आम्ही महाडेश्वर कुटुंबाच्या दुखात सहभागी आहेत.

- Advertisment -