घरमहाराष्ट्रमाजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन

माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन

Subscribe

त्यांचा जन्म व शिक्षण चिपळूणमध्ये, वकिली मुंबईत आणि आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले हुसेन दलवाई चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे असे सांगत व दोन्ही तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळयाचे नाते ठेवीत.

माजी मंत्री आणि रत्नागिरीचे माजी खासदार हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचे सोमवारी सायंकाळी मुंबई येथे निधन झाले. ते येत्या १७ ऑगस्ट रोजी वयाची शंभरी पूर्ण करणार होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदार संघातून ते चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात ते कायदा, राजशिष्टाचार, बंदरे मंत्री होते. तर  यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जात होते.

त्यांचा चिपळूणमध्ये १७ ऑगस्ट १९२२ ला जन्म झाला. अस्खलित मराठी बोलणारे, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर विद्वत्तापूर्ण प्रभूत्त्व असणारे दलवाई हे पाहता क्षणी त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल असे व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्न चेहऱ्याने सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेत असत. गेली सुमारे  २० ते २२ वर्षे ते राजकारणापासून दूर होते. पण राजकारणी माणसांशी असलेले त्यांचे संबंध आजपर्यंत कायम होते. ते कट्टर काँग्रेसवासी होते. मात्र त्यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

- Advertisement -

त्यांचा जन्म व शिक्षण चिपळूणमध्ये, वकिली मुंबईत आणि आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले हुसेन दलवाई चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे असे सांगत व दोन्ही तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळयाचे नाते ठेवीत. आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण, कै. वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मोठा उठाव झाला. त्यासाठीच्या सर्व बैठका त्यांच्या मुंबईतील ओव्हल मैदानासमोरच्या एम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी होत.  शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते तेथे एकत्र येत. त्यानंतरच्या काळात शंकररावांच्या जागी वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात दलवाई यांना मंत्री केले. त्यानंतर बॅ.अ.र.अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचेही विभाजन झाले.

राज्यसभेवर ते खासदार म्हणून दोनवेळा निवडून गेले. काही काळासाठी त्यांनी अल्पसंख्य आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. तेथेही कार्यकर्त्यांची सदैव वर्दळ असे. त्याच सुमारास ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यरत झाले. रोज सकाळी तीन तास ते प्रतिष्ठानमध्ये काम करीत असत. लोटे येथे औद्यागिक वसाहत निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -