ठा.म.पा माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचं निधन

माजी ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर वामन चव्हाण यांची वयाच्या ६४ वर्षीय शनिवारी ठाण्यात एका नामांकित रुग्णालयात प्राणज्योत मालवली. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच ते सुधाभाई म्हणून सर्वत्र प्रचलित होते. अपक्ष नगरसेवक असताना ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी तब्बल चार वेळा तर एक वेळा परिवहन सभापती पदी विराजमान झाले होते. त्यांची मराठी चित्रपट सृष्टीशी चांगलीच नाळ जुळली होती. तसेच त्यांनी आपला ठसा धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ही तितकाच उठवला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा असा परिवार आहे.

१९९२ साली ते पहिल्यांदा ठाणे महापालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले होते. तेंव्हापासून ते २०१७ असे तब्बल २५ वर्षे म्हणजेच पाच टर्म ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. तसेच अपक्ष म्हणून त्यांनी तीघांचे पॅनलही पालिकेवर निवडून आणले होते. २००९ साली त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यावेळेसही त्यांनी मनसेचे तीन नगरसेवक निवडून आणले होते.

रिक्षा चालक ते नगरसेवक असा त्यांचा मोठा प्रवास राहिला आहे. पालिकेत निवडून आल्यानंतर चार वेळा त्यांनी स्थायी समिती सभापती पद तर एकदा परिवहन समितीचे सभापतीपदही भुषविले होते. तसेच शिवाई विद्या प्रसारक मंडळ, डिस्ट्रीक लेव्हल जिमन्यास्टीक असोसिएशन, माजिवडा ट्रेव्हलर्स ग्रुप, शिवा नगर कला केंद्र क्रिडा मंडळ, शिवाई नगर नवरात्र उत्सव मंडळ, म्हाडा वसाहत महा संघ, स्वामी विवेकानंद नगर ठाणे आदीचे देखील अध्यक्ष पद भुषविले होते. तसेच ठाणे डिस्ट्रीक कब्बडी असोसिएशन, नवी मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशन, विजू नाटेकर रिक्षा टॅक्सी युनियन, रिक्षा टॅक्सी युनियन कोकण डिवीजन आदींचे उपाध्यक्ष पद भुषविले होते. तर सुलोचना ग्राम विकास प्रतिष्ठान ठाणे, यशोधन इंग्लिश मिडीयम स्कुल लोकमान्य नगर, स्टुडन्ट फ्युचर असोसिएशन, संस्कार प्रतिष्ठा ट्रस्ट, भक्त कल्याण गणपती मंदीर उपवन आदींचे त्यांनी प्रमुख सल्लागार पदही भुषविले होते. रविवारी सकाळी ११ वाजता मंत्राजली निवास येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.


हेही वाचा : या मंत्री, आमदार, खासदारांनी थकवले लाखो रुपयांचे लाईट बील, या मंत्र्याकडे आहे सर्वाधिक थकबाकी