घरमहाराष्ट्रकिल्ले रायगड परिसर आऊट ऑफ रेंज !

किल्ले रायगड परिसर आऊट ऑफ रेंज !

Subscribe

ग्रामस्थ आणि पर्यटक अस्वस्थ ,अधिकारी गप्प

रायगड किल्ला संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाच पायथ्याशी असलेल्या पाचाड व अन्य गावातील मोबाईल, एटीएम सेवा ठप्प झाल्याने पर्यटकांसह शिवप्रेमी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक डिजिटल सुविधा बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) च्या इंटरनेट सेवेवर आधारित आहेत. मात्र ही सेवा ठप्प झालेली असून ग्रामस्थांनी कितीही तक्रारी केल्या तरी कंपनीचे अधिकारी गप्प आहेत.

पाचाड, हिरकणी वाडी, रायगड पायथा, रायगड वाडी, नेवाळी, छत्री निजामपूर, सांदोशी, सावरट, बाऊलवाडी येथील ग्रामस्थांना गेल्या चार दिवसांपासून दूरध्वनी नेटवर्कची समस्या भेडसावत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचे टॉवर असले तरी येथे बीएसएनएल अथवा आयडियाची रेंज मिळत नाही. आयडियाची सेवा बंद झाल्यास सुरू तरी होते, पण बीएसएनएलचे नेटवर्क कायमच बंद असते. पर्यटकांची हॉटेल नोंदणी, तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था, अनेकजण दूरध्वनीद्वारे आपले आगाऊ आरक्षण करीत असतात. पर्यटनाबाबत चौकशी करीत असतात. परंतु नेटवर्क उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

- Advertisement -

याहीपेक्षा भयानक अवस्था येथे असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएमची आहे. त्यातून रक्कम काढता येत नाही आणि सुरक्षिततेसाठी वॉचमनही नाही. नेटवर्क नसल्याने एटीएममधून पैसे मिळणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात येथे येणारे पर्यटक जास्त रक्कम सोबत घेऊन येत नाहीत. यावेळी पैशाची गरज लागल्यास पैसे उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होते. काही हॉटेल मालक पेटीएम अथवा अन्य अ‍ॅपद्वारे कॅशलेस व्यवहार करतात. पण त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. स्थानिक ग्रामपंचायत व व्यावसायिकांनी अनेकदा बीएसएनएलकडे संपर्क साधून तक्रारी केल्या. पण त्यांच्या कारभारात कोणतीही सुधारणा झालेली नाही.

डिजिटल इंडियाचे स्वागतच आहे. परंतु पाचाड येथे नेटवर्क अभावी एटीएम बंद झाले आहे. फोन, मोबाईल बंद असल्यामुळे शिवरायांच्या दर्शनाला येणारे शिवप्रेमी संताप व्यक्त करीत आहेत.
-राजेंद्र खातू, माजी सरपंच, पाचाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -