शिंदेंच्या मंत्रिमंडळातील चार महत्त्वाचे निर्णय, MMRDAला ६० हजार कोटींचे कर्ज

उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे, ते धाराशिव करण्याबाबतचा मोठा निर्णय शासनानं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय

shinde - fadanvis

मुंबईः फडणवीस आणि शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळानं आज चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. शिंदे मंत्रिमंडळाची आज बैठक झाली, या बैठकीत एमएमआरडीएला 60 हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये 29 तारखेला म्हणजे त्यावेळी सरकार अल्पमतात होते. अशा वेळेस काही निर्णय घाईगडबडीत शासनाने घेतले. पुढे त्यावर कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये म्हणून मिनिट्स कन्फर्मेशनच्या वेळेस सांगितले की, हे प्रस्ताव फेरसादर करा, रीतसर त्याला मान्यता देण्यात येईल. आजच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं जे नाव आहे, ते छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे, ते धाराशिव करण्याबाबतचा मोठा निर्णय शासनानं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

त्याचबरोबर नवी मुंबईचे जे एअरपोर्ट आहे, त्याला देखील लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई एअर पोर्ट असं नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. नवी मुंबईतल्या भूमिपुत्रांनी केलेली मागणी विचारात घेऊन आम्ही लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई विमानतळ असा देखील निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आमचं बहुमताचं सरकार आहे, लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असतं. बहुमत म्हणजे 165 ते 166 आमदारांचं बहुमत ज्या सरकारला प्राप्त आहे. त्या मंत्रिमंडळात आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत. एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

• औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय

• उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय

• नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय

• एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.


हेही वाचाः