घरमहाराष्ट्रमोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच; सीबीआयमार्फत चौकशी करा, तपासेंची मागणी

मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच; सीबीआयमार्फत चौकशी करा, तपासेंची मागणी

Subscribe

मुंबई – ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात कंत्राट मिळवण्यासाठी चार लाख डॉलरची लाच ओरायकल कंपनीने दिल्याप्रकरणी २३ मिलियन डॉलरचा दंड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ॲंड एक्स्चेंज कमिशनmymने कंपनीला ठोठावला असून याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

नरेंद्र मोदी यांनी देशात सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्याच राजवटीत ओरायकल कंपनीच्या माध्यमातून भारतीय रेल्वे अंतर्गत कंत्राट मिळण्यासाठी जवळपास चार लाख डॉलरची लाच देण्यात आली, याचा खुलासा झाला असून जेव्हा हा भ्रष्टाचार झाला त्यावेळी रेल्वे मंत्रालय पियुष गोयल यांच्याकडे होते. मात्र एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारावर रेल्वे मंत्रालयाने किंवा भारत सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे या चार लाख डॉलरचा भ्रष्टाचार करुन ज्यांनी कंत्राट दिले त्यांची चौकशी करुन जनतेसमोर उभे केले पाहिजे अशी मागणीही महेश तपासे यांनी यावेळी केली. दरम्यान या भ्रष्टाचारासंदर्भातील भूमिका पियुष गोयल यांनी स्पष्ट करावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचा बीकेसीवरील मेळावा फेल…

काल एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. वास्तविक राज्यातील जनतेची खूप अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री राज्याला संबोधन करत असतात तेव्हा राज्याच्या हिताच्या योजना किंवा धोरण मांडतील परंतु योजना मिळणं दूर मुख्यमंत्र्यांना भाषणात धोरणही जाहीर करता आलं नाही त्यामुळेच त्यांचा हा मेळावा फेल झाला आहे अशी जोरदार टीका महेश तपासे यांनी केली आहे.

- Advertisement -

या मेळाव्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला बोलावलं असतं तर महाराष्ट्राला आधार मिळाला असता परंतु चंपा थापाला बोलावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपमान केला आहे असा आरोपही महेश तपासे यांनी यावेळी केला.

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसवर टिका केली. त्यांनी जरुर टिका करावी परंतु अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना हेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शेजारी बसलेले जनतेने पाहिले आहे आणि त्याकाळात मुंबई व महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेल्या सर्व निर्णयामध्ये शिंदे सहभागी होते. त्यामुळे आज टिकेतून दुजाभाव करण्यात आला ही गोष्ट बोलणं योग्य नाही असेही महेश तपासे म्हणाले.

ज्या पध्दतीचे भाषण एकनाथ शिंदे करत होते. समजा काल पाऊस आला असता तर हातासमोरील चिठ्ठी भिजली असती तर नेमकं पुढे काय बोलावं हे सुचलं नसतं असा खोचक टोला लगावतानाच यावेळी महेश तपासे यांनी परमेश्वराला पाऊस न पाडल्याबद्दल लाख आभार मानले.

राजकारणात असताना आणि मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यातील जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडून होत्या मात्र या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कुठलीही नवीन योजना मोठा मेळावा घेऊनही मांडू शकले नाहीत वैचारिक दिवाळखोरपणा या सरकारचा आहे का अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे असा थेट हल्लाबोल महेश तपासे यांनी यावेळी केला.

जी लोकं बीकेसीच्या मैदानावर आली कशी आणली हे संपूर्ण माध्यमातून दाखवण्यात आले. बीकेसीच्या शेजारी असलेले मुंबई विद्यापीठाचे मैदान आहे त्यावर कसल्या बाटल्यांचा खच जमा झाला आहे याचेही चित्रिकरण माध्यमातून झाले आहे. वास्तविक काल आणलेली गर्दी ही दर्दी होती का की पैसे देऊन जमवलेली गर्दी होती याचा निर्णय राज्यातील जनतेने करावा असे सांगतानाच कालच्या शिंदेच्या मेळाव्यातून महाराष्ट्राला काही मिळाले नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात महेश तपासे यांनी शिंदे यांच्यावर शरसंधान साधले.

अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा

अंधेरी पोटनिवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा असून प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेब यांनी तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची ही जागा प्रचंड मताने निवडून येईल असा विश्वास महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केला. स्वतःला शिवसेना म्हणवून घेणार्‍यांना या निवडणुकीत भाजपने साधं विचारलंही नाही आणि भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेना म्हणून शिंदे गटाला जवळ केले असेल तर ती जागा सोडायला हवी होती. मात्र तसे न करता भाजपने शिंदे गटाला डावळून भाजपची उमेदवारी जाहीर केली आहे. यातून भाजपची काय रणनीती आहे हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची ही जागा दणदणीत मतांनी निवडून आणू असा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हापासूनच आमचे व कॉंग्रेसचे समर्थन हे उध्दव ठाकरे यांना आहे. उत्कृष्ट कामगिरी झाली म्हणूनच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये उध्दव ठाकरे यांचे नाव आले. आता जो शिंदे गट तयार झाला आहे तो राजकीय षडयंत्राचा भाग होता. त्यामुळे खरी शिवसेना ही बाळासाहेबांच्या आणि उध्दव ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे. अशा पक्षासोबत राष्ट्रवादी आहे असेही महेश तपासे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

देशातील सर्व पक्षांची मोट बांधून मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी आदरणीय शरद पवारसाहेब हे आग्रही होते आणि आजही आहेत. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे महाराष्ट्रात येत आहेत तर त्यांचे स्वागत आहे. जे जे लोकं भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत त्यांना नक्कीच समर्थन असणार आहे. ज्यांची भाजपच्या मनुवादी विचारांच्या विरोधात भूमिका आहे त्यांना राष्ट्रवादी नक्की बळ देईल असेही महेश तपासे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -