वादळी पावसाने संगमनेरमध्ये घेतला चौघांचा बळी

Four people died in Sangamner due to heavy rains

राज्यात पावसाचे आगमन झालेले आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये भिंत अंगावर कोसळून तीघांचा जीव गेला आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत. दुसऱ्या एका घटनेत वादळी पावसाने झाड अंगावर पडून एका एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील अकलापूर गावातील मुंजेवाडी शिवारात पावसामुळे भिंत अंगावर पडून तीघांचा मृत्य झाला असून दोन जण जखमी झाले. ही घटना गुरूवारी (9 जून) चारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एका 10 वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे.

मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुधवडे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. गुरूवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडू लागला. दुधवडे हे कुटुंबासोबत घरात बसले असाताना अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांब अंतरावर जाऊन पडले. काही समजण्याच्या आतच घराच्या भिंतीही पडल्या. भिंती अंगावर पडल्याने विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय ७५), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय ६७ ), साहील पिना दुधवडे (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाला. वनिता पिना दुधवडे (वय 8) आणि मंदाबाई बिठ्ठल दुधवडे (वय 70) हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, महसूल मंडल अधिकारी इराप्पा काळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सरकारी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले.

दुसऱ्या घटनेत संगमनेर तालुक्यातीलच मालदाडीत झाड कोसळून महिलेचा मृत्यू झाला. शहरातून जाणाऱ्या नाशिक मार्गावर अनेक मोठी झाडे कोसळली आहेत. तर, शासकीय विश्रामगृह परिसरातही झाडे उन्मळून पडली आहेत. वादळी वाऱ्यासह आलेल्या पहिल्याच पावसाने संगमनेर तालुक्यात या घटना घडल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.