एसटीचे चार हजार कर्मचारी वॉन्टेड

ST Bus
कोरोना काळात एसटी महामंडळाचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्या असून आतापर्यंत एसटी महामंडळाचे चाक पूर्वपदावर आलेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळ आपला महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करत असताना एसटी महामंडळाचे राज्यभरातील 4 हजार पेक्षा जास्त कर्मचारी कोरोना प्रभावकाळापासून वॉन्टेड आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून त्यांना पत्र लिहून कामांवर येण्याचा विनंती करण्यात येत आहे. तसेच अनेकांना आता कामावरुन काढण्याची तयारीसुध्दा एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.

महामंडळाची डोकेदुखी वाढली

गेल्या वर्षी 23 मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आलेला होता. तेव्हा राज्यातील एसटी महामंडळाचे चाक थांबले होते. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांचा वाहतुकीसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील एसटीच्या बस गाड्या रस्त्यांवर धावत होत्या. मात्र या तिन्ही  विभागातील  एकूण कर्मचार्‍यांपैकी फक्त 30 टक्के कर्मचारी कर्तव्यावर होते. त्यामुळे तेव्हा एसटी महामंडळाने गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना निलंबनाची कारवाई आणि गैरहजर राहणार्‍या कामगारांना वेतन देण्यात येत नव्हतं. मात्र अ‍ॅनलॉकनंतर राज्यभरातील एसटी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या आहेत. तरीसुध्दा राज्यभरातील 1 लाख कर्मचार्‍यांपैकी  4 हजारपेक्षा जास्त कर्मचारी कोरोनापासून कामावर आलेले नाही. त्यामुळे सध्या हजर असलेल्या एसटी कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे. कोरोना काळात एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. कोरोनापूर्वी एसटी महामंडळाचा संचित तोटा हा 4 हजार कोटी होता तो कोरोना काळात 6 हजार 500 कोटी रुपयापर्यंत पोहचला आहे. कोरोना काळात एसटी महामंडळाकडे कर्मचार्‍यांचे 6 महिन्याचे वेतन देण्यासाठी आपली तिजोरी रिकामी केली तसेच कर्जसुध्दा घेतले आहे. त्यामुळे सध्या एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अत्यंय नाजूक झाली आहे. कर्मचारी गैरहजर असल्याने एसटी महामंडळाचे आणखी डोके दुखी वाढली आहे.

बडतर्फाची होणार कारवाई

एसटी महामंडळाचे अधिकार्‍यांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले की, कोरोना काळापासून राज्यभरातील विविध आगारातून 4 हजारपेक्षा जास्त कर्मचारी गैरहजर आहे. त्यामुळे अनेक आगारात कामगारांची कमतरता भासत आहे. गैरहजर असलेल्या एसटी कामारांना महामंडळाकडून कामावर हजर होण्यासाठी नोटीस बजावत आहे. तीन नोटीस बजावल्यानंतरही एसटी कर्मचारी कामावर हजर राहणार नसतील किंवा नोटिशीला उत्तर देणार नसतील तर अशा कर्मचार्‍यांवर  बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.