भाजप आमदारासह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा, १५ कोटींचा अपहार केल्याचा आरोप

bjp

औरंगाबादमधील गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्ताऐवज वापरुन गंगापूर साखर कारखान्यातील सदस्यांची १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत बंब यांच्यावर लावण्यात आला आहे. या प्रकरणी प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्याज वाटण्याच्या नावाखाली अधिकची दिली जाणारी रक्कम अपहार करण्यासाठी बेकायदेशीररित्या वापरल्याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्र तयार करून सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी सभासदांची फसवणूक करत १५ कोटींचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

गंगापूर सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. राज्य सरकारने या कारखान्यावरील कर्जापोटी हा कारखाना जप्त देखील केलेला आहे. तर, संबंधित बँकेने हा कारखाना विक्रीस काढल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाने या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयीन कारवाईत गंगापूर न्यायालयात कारखान्याकडून रक्कम जमा करण्यात आली होती. त्यांनतर हा विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात आला होता. त्यामुळे न्यायालयाकडून ही रक्कम कारखान्याच्या खात्यात जमा झाली होती. ती आतापर्यंत व्याजासह १५ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रशांत बंब यांनी जमा झालेल्या पैशांवर कारखान्याचा संबंध नसल्याचा अजब दावा केला आहे. त्यामुळे १४ सदस्यांनी बंब यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ७ नोव्हेंबर २०२० रोजी कारखान्याला ही रक्कम परत मिळाली. कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब आणि प्रभारी संचालक बी. एम. पाटील यांनी संगनमत करून २० जुलै रोजी ही रक्कम बेकायदेशीररित्या कारखान्याचे खाते उघडून आणि खाते उघडण्यासाठी देखील कारखान्याचा ठराव करण्यात आला होता, तो देखील बनावट असल्याचे या तक्रारीत म्हटलेले आहे. खाते उघडत असताना कारखान्याची भागीदारी दाखवण्यात आली. त्यामध्ये आमदार बंब आणि पाटील हे भागीदार असल्याची बनावट कागदपत्र तयार केली गेली. नागरी सहकारी बँकेत खाते उघडत असताना जी परवानगी घ्यावी लागत होती, ती परवानगी देखील घेतली नाही असे देखील तक्ररीत म्हटले आहे. प्राप्त झालेली रक्कम विविध ठिकाणी टाकण्यात आली. कारखाना हा वित्तीय संस्था नाही त्यामुळे ती व्याज वाटू शकत नाही, असे देखील तक्रारीत म्हटले आहे.