Kirit Somaiya : INS विक्रांतप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांविरोधात माजी सैनिकाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारावईनंतर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि पुत्र निल सोमय्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांतसाठी SAVE INS VIKRANT अशी मोहिम राबवत सोमय्यांनी पैसे गोळा केले होते. या पैशांचा अपहार केला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. यावरुन माजी सैनिक बबन भोसले यांनी बुधवारी उशिरा रात्री ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांविरोधात माजी सैनिकाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमय्यांनी देशद्रोह केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ५७ कोटी ते १०० कोटी रुपयांची रक्कम सोमय्यांनी निवडणूक आणि आपल्या मुलाच्या कंपनीत वापरली आहे. यामध्ये माजी सैनिकांनीही निधी दिला होता परंतु तो निधी राजभवनात पोहोचलाच नाही. यावरुन माजी सैनिकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी माजी सैनिक बबन भोसले आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसह अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

INS विक्रांतला वाचवण्यासाठी गोळा केलेला पैसा कुठे गेला?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर मोठा आरोप करत आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी जो पैसा खर्च झाला, तो गेला कुठे? किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले होते की, भाजपने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली आणि लोकांकडून पैसे गोळा केले. हे पैसे राजभवनात जमा करायचे होते आणि तेव्हा किरीट सोमय्या यांनी राजभवनात पैसे जमा करण्याबाबत बोलले होते, मात्र त्यांनी राजभवनाकडून माहिती मागवली असता, तसे पैसे मिळाले नाहीत असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे हा पैसा कुठे गेला याबाबत किरीट सोमय्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी याबाबत कारवाई करावी असे आवाहन देखील राऊतांनी केले आहे.

सोमय्यांनी निवडणुकीसाठी पैसा वापरला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ५७ कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला होता. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती आणि किरीट सोमय्या यांनी ठेवलेल्या पैशाचा त्यांच्या व्यवसायासाठी वापर केल्याचा आरोप केला होता, त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ट्रॉम्बे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा : केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर राऊतांचं बोट, केंद्राकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा राज्यसभेत आरोप